केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी फोन आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. पहिला कॉल आज सकाळी ११.२८ मिनिटांच्या सुमारास आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला असून पुढील तपास सुरु आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास धमकीचा कॉल आला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तसेच कॉलवर मला खंडणी द्या अन्यथा मी सोडणार नाही अशा आशयाची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांचा ताफा तपासासाठी गडकरींच्या कार्यालयात पोहोचला. तसेच सायबर सेललाही या संदर्भात माहिती देण्यात आली असून कॉलबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. एकूण 3 वेळा फोन करण्यात आले होते. ११.२८ आणि १२.४० मिनिटाने फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता. २ कोटी रुपये द्या नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार गडकरी सध्या नागपुरात असून एका कार्यक्रमात आहेत. हा धमकीचा कॉल आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या धमकीच्या कॉलमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.