Yogi Adityanath On Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रासह आता उत्तर प्रदेशाताही चांगलंच राजकारण तापलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असं आमदार अबू आझमी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. एवढंच नव्हे तर राज्यात विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमी यांच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उस कंबख्त को निकालो पार्टी से और UP भेज दो, बाकी उपचार हम करेंगे’, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाचे लोक औरंगजेबला आपला हिरो मानत असल्याचा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच, अबू आझमी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलं?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, ‘अबू आझमी यांना (समाजवादी) पक्षातून काढून उत्तर प्रदेशला पाठवा. आम्ही त्यांच्यावर ‘उपचार’ करू. समाजवादी पक्षाने एकीकडे महाकुंभमेळ्याला दोष दिला आणि आता देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेब सारख्या व्यक्तीची प्रशंसा समाजवादी पक्षाच्या एका आमदाराकडून होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही?’, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे. अबू आझमी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्या माणसाला पक्षातून बाहेर काढा आणि नसेल तर यूपीला पाठवा.
#WATCH | Lucknow: On Samajwadi party MLA Abu Azmi's statement on Aurangzeb, which he later withdrew, UP CM Yogi Adityanath says, " Remove that person from (Samajwadi) party and send him to UP, we will do his treatment. The person who feels ashamed about the heritage of… pic.twitter.com/SHXClYoyaz — ANI (@ANI) March 5, 2025
अबू आझमी यांनी काय वक्तव्य केलं होतं?
‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही,’ असं विधान अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.
अखिलेश यादव यांच्याकडून ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल’ करत अबू आझमींचा बचाव
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल’ करत पक्षाचे नेते अबू आझमी यांचा बचाव केला. त्यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले. ‘जर निलंबनाचा आधार विचारसरणीने प्रभावित होऊ लागला तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीत काय फरक राहील? आपले आमदार असोत किंवा खासदार, त्यांचे निर्भय शहाणपण अतुलनीय आहे. जर काही लोकांना असे वाटत असेल की ‘निलंबन’ करून सत्याची जीभ दाबता येते, तर हा त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा आहे. आजचा मुक्त विचार म्हणतो, आम्हाला भाजप नको आहे!’ अशी एक्स पोस्ट अखिलेश यांनी केली आहे.
निलंबन का आधार यदि विचारधारा से प्रभावित होने लगेगा तो अभिव्यक्ति की स्वतंत्रता और परतंत्रता में क्या अंतर रह जाएगा। हमारे विधायक हों या सांसद उनकी बेख़ौफ़ दानिशमंदी बेमिसाल है। कुछ लोग अगर सोचते हैं कि ‘निलंबन’ से सच की ज़ुबान पर कोई लगाम लगा सकता है तो फिर ये उनकी नकारात्मक सोच… — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 5, 2025
अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं
अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर टीका झाली. यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं. ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो”, असं म्हणत अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं.
अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचं निलंबन
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली. भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली. या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत.
हेही वाचा – दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत 18 नव्हे, 200 जण मारले गेले; याचिकाकर्त्याचा सर्वोच्च न्यायालयात दावा
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह या बाबीही अधोरेखित
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा एखाद्याच्या अभिव्यक्तीमुळे, त्यातील शब्दांमुळे, त्यातील अर्थामुळे विनाकारण दुसऱ्या एखाद्याच्या भावना दुखावण्याचा मुद्दा चर्चेत येतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक भान, जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन अनेकदा केले आहे. या एकंदरित पार्श्वभूमीवर आता अबू आझमी यांनी केलेले वक्तव्य, त्यांनी ते वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हणणे आणि त्यांचे निलंबन यानंतर पुढे या प्रकरणाला आणखी काय दिशा मिळते, ते येणाऱ्या काळात समजेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.