देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. दररोज इंधनाच्या दरात वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या पैशांना जास्तीची कात्री लागत आहे. दरम्यान, इंधनाच्या दरवाढीमुळे हिंगोलीत पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली. हिंगोलीतील वसमत शहरातील तीन पेट्रोल पंपावरील पेट्रोलसाठा संपल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली.
हिंगोलीतील वसमत शहारात पेट्रोलसाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. शहरातील चार पेट्रोल पंपापैकी तीन पेट्रोल पंपावरील पेट्रोल साठा संपला आहे. त्यामुळे उर्वरित एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
इंधनाचे भाव गगनाला भिडल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसायिकांना आर्थिक तडजोड करत पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. तसेच पेट्रोलचा तुटवडा भासल्यामुळे पेट्रोल खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. काही दिवसांपूर्वी वसमत शहरात पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ८४-८४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये नवव्यांदा इंधनात दरवाढ करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.