नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी वाचन सुरू केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात काही छायाचित्रे आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका तरुणाच्या मानेवर आणि हातावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. एक्सवरील एका पोस्टमध्ये, दीपके यांनी दावा केला की, आंदोलनस्थळी लोकांना पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोन विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. “जंतर मंतर येथे ग्रंथालय उभारल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी दोन तरुण मुलांना मारहाण केली. या मुलांना फक्त एवढेच हवे होते की, आंदोलनस्थळी लोकांनी पुस्तके वाचावीत. पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला का केला?” असे त्यांनी लिहिले.
दीपके यांनी असाही आरोप केला की, मारहाणीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना, “आम्ही तुम्हाला मारहाण केली याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे?” असे विचारून त्यांची चौकशी केली. सीजेपीच्या (CJP) संस्थापकाने पुढे असा आरोप केला की, या घटनेदरम्यान एसीपी अजय शर्मा आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्यावरील पुस्तकांसह इतरही पुस्तके फेकून दिली. पुस्तके फेकून देणे म्हणजे दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा अपमान करण्यासारखे आहे, असा आरोप करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्याची मागणी केली.
दिल्ली पोलिसांनी या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हे आरोप अशा वेळी करण्यात आले आहेत. जेव्हा पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे जंतरमंतर येथे उपोषण सुरू असून आज त्याचा पाचवा दिवस आहे. एक्स पोस्टद्वारे वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतची माहिती शेअर करताना दिपके यांनी दावा केला की, या कार्यकर्त्याची रक्तातील साखरेची पातळी 60 पर्यंत खाली आली आहे आणि रक्तदाबही कमी आहे. सोनम सर यांना काहीही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल,” असे ते म्हणाले. दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही पुन्हा एकदा लावून धरली. आंदोलनाचा १३ वा दिवस असताना, दिपके यांनी ‘झुरळांसोबत चहावर चर्चा’ या उपक्रमाचे आयोजन केले. यामागील उद्देश आंदोलन अधिक व्यापक करण्याबाबत आंदोलकांकडून सूचना मागवणे हा होता.
After assaulting students the police shamelessly asks “proof kya hai ki humne maara?” pic.twitter.com/hMz3TiZThQ — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 2, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.