Anand Sagar death: भारतीय दूरचित्रवाणीतील एक युग संपले: रामायणचे वारसदार आनंद सागर यांचे 84व्या वर्षी निधन

रामायणचे निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र आणि ज्येष्ठ निर्माते आनंद सागर यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजारानंतर मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Anand Sagar death: भारतीय दूरचित्रवाणीतील एक युग संपले: रामायणचे वारसदार आनंद सागर यांचे 84व्या वर्षी निधन

Anand Sagar death: भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णकाळाशी नाळ जोडलेल्या सागर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. शुक्रवारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनातून ही दु:खद माहिती दिली. “आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, यासाठी सर्वांच्या प्रार्थना अपेक्षित आहेत,” असे कुटुंबीयांनी म्हटले आहे. दुपारी 4.30 वाजता हिंदू समाज भूमी (पवन हंस) येथे अंत्यसंस्कार पार पडले.

आनंद सागर हे दिग्गज निर्माते-दिग्दर्शक रामनंदन सागर यांचे सुपुत्र होते.1980च्या दशकात भारतीय दूरचित्रवाणीला घराघरात पोहोचवणाऱ्या ‘रामायण’ मालिकेमुळे रामानंद सागर यांचे नाव अजरामर झाले. त्या परंपरेचा वारसा पुढे नेत आनंद सागर यांनीही पौराणिक व ऐतिहासिक कथांना आधुनिक मांडणी देण्याचे काम केले.

वडिलांच्या निधनानंतर सागर कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीची जबाबदारी आनंद सागर यांच्याकडे आली. सागर आर्टस् या बॅनरखाली त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाताळले. विशेषतः 2008 मध्ये आलेली ‘रामायण’ ही मालिका त्यांनी नव्या पिढीसाठी सादर केली. तंत्रज्ञान, भव्य सेट्स आणि समकालीन कथनशैली यांचा मिलाफ करून त्यांनी पौराणिक कथांना नवे रूप दिले.

दूरचित्रवाणीबरोबरच चित्रपटसृष्टीतही आनंद सागर सक्रिय होते. ‘आंखें’, ‘अरमान’ आणि ‘अलिफ लैला’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मिती-दिग्दर्शनात त्यांचा सहभाग होता. मनोरंजनाबरोबरच मूल्याधिष्ठित कथन ही त्यांची खास ओळख होती. भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि कुटुंबकेंद्री भावना पडद्यावर जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम दिसून आला.

गेल्या 10-12वर्षांपासून आनंद सागर आजारी होते. तरीही सागर कुटुंबाशी जोडलेली सर्जनशील परंपरा टिकून राहावी, यासाठी ते सतत मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या जाण्याने केवळ सागर कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण दूरचित्रवाणी विश्वाने एक महत्त्वाचा दुवा गमावला आहे.

रामायणसारख्या कालातीत कथेचा वारसा पुढे नेणारे आनंद सागर आज शांत झाले असले, तरी त्यांनी दिलेले योगदान भारतीय मनोरंजनाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version