बंगळुरू : बंगळुरूच्या उपनगरातील मडापट्टना गावात एका दगडी खाणीत काम करत असताना अवाढव्य खडक अंगावर पडल्याने गुरुवारी सात कामगारांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक जणांना नंतर बाहेर काढण्यात आले. 'कावेरी कंपनी'च्या मालकीच्या या खाणीच्या वरच्या भागात 'एक्स्कॅव्हेटर'च्या (उत्खनन यंत्राच्या) साहाय्याने खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. या कामादरम्यान एक मोठा खडक निखळून खाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. एका कामगाराने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, घटनास्थळी सुमारे 18 कामगार होते. तो प्रचंड खडक सुमारे 40 फुटांवरून कामगारांवर पडला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी बचाव व शोधकार्य सुरू केले. वरिष्ठ अधिकारी या मोहिमेवर देखरेख करत होते. तर इमारत कोसळण्याचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. या खाणीतील कामगार मूळचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, "मगाडी रोड परिसरातील एका दगडी खाणीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ते आधीच घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सुमारे सात जण अडकले असण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी संख्या आणि परिस्थितीबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. पहिल्या अहवालात असे म्हटले आहे की, हे प्रकरण स्फोट घडवून दगड काढण्याशी (ब्लास्टिंगशी) संबंधित नाही. तर ज्या ठिकाणी जमिनीची धूप झाली आहे. त्या मातीच्या भागाशी ते संबंधित आहे. मी त्याबाबतचा अहवाल मागवून घेईन आणि नियमांनुसार उत्खनन केले गेले आहे का, तसेच पाळले जाणे आवश्यक असलेले नियम नेमके काय होते, याची तपासणी करेन. त्यानंतर, संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या उत्खनन कार्याबाबत आम्ही नवीन मार्गदर्शक सूचना जारी करू. अशी कोणतीही कृती किंवा घटना पुन्हा घडणार नाही, याची मी खबरदारी घेईन," असे त्यांनी पुढे सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.