अयोध्या, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत जोरदार स्वागत झाले. ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. परंपरागत पद्धतीने पंतप्रधान मोदी यांचे अयोध्येत स्वागत झाले. यानंतर अयोध्या विमानतळ – धर्मपथ – रामपथ – अयोध्या धाम रेल्वे स्थानक या संपूर्ण परिसरात मोदींनी शक्तिप्रदर्शन केले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून तसेच घोषणा देत मोदींचे उत्साहाने स्वागत केले. संगीत, वादन, पारंपरिक भेष गायनानेही मोदींचे स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान मोदींकडून अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांसोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. यासोबत अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये महाराष्ट्रातील जालना ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदींनी दाखवला आठ रेल्वेंना हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदींनी अयोध्येत हिरवा झेंडा दाखवून देशाला आठ ट्रेनची भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगलोर, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल दरम्यान सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट दिल्या. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन-बंगळुरू दरम्यान अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येतून ते देशात ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात जालना ते मुंबई अशा वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे. जालन्यातून वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. जालन्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत ट्रेनची सुरुवात ही जालन्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.