नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असताना संरक्षण व्यवस्थेत चूक झाल्याचे आढळले. प्रेक्षक गॅलरीतून काही जणांनी लोकसभेत घुसखोरी केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी कामकाज सुरू असताना घडली. सुरक्षा रक्षकांनी घुसखोरांना पकडले आहे. घुसखोरांची चौकशी सुरू आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
भारताच्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला करणारे पाच आत्मघातकी दहशतवादी सुरक्षा रक्षकांनी ठार केले. यानंतर थेट १३ डिसेंबर २०२३ रोजी काही जणांनी लोकसभेत घुसखोरी केली. यामुळे यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घुसखोरी करणाऱ्यांमध्ये एक महिला
अ. घुसखोरी करणाऱ्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष होते. या ४ जणांना पोलिसांनी पकडले. घुसखोरांची चौकशी सुरू आहे.
ब. घुसखोरांची नावं : १. अमोल शिंदे, लातूर जिल्हा, चाकूर तालुका, थोरली झरी गाव – वय २५, २. नीलम सिंग, हिस्सार, ३. सागर शर्मा, ४. मनोरंजन, इतर दोन फरार
क. घुसखोरांनी म्हैसूरच्या खासदाराच्या नावाने लोकसभेत प्रवेश करण्यासाठी पास (व्हिजिटर पास) तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे.
ड. घुसखोरांनी बुटातून रंगीत धूर सोडणाऱ्या स्मोक कँडल आणल्या होत्या.
खलिस्तानी दहशतवाद्यांची धमकी
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने काही दिवसांपूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. यानंतर काही दिवसांतच लोकसभेत घुसखोरीचा प्रकार घडला. यामुळे घुसखोरांचा खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध आहे का याची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.
दिल्ली पोलीस करणार चौकशी
संसदेत झालेल्या घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत. घुसखोरी करणाऱ्या ४ जणांना पकडले आहे. या ४ जणांची कसून चौकशी केली जाणार आहे. घुसखोरांना पकडल्यानंतर संसदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
प्रेक्षक गॅलरीचे पास देण्यावर बंदी
संसदेत घडलेल्या घटनेनंतर संसदेचे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे प्रेक्षक गॅलरीचे पास देण्यावर पुढील आदेशापर्यंत तातडीने बंदी घालण्यात आली आहे.
………
संसदेचा पास : खासदाराचे शिफारसपत्र, आधारकार्ड तपासून देतात पास
संसदेत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात पास देण्यास बंदी
संसदेत यांना मिळेल पास : खासदार, प्रत्येक खासदाराचे कमाल २ सहाय्यक, संसदेचे अधिकारी – कर्मचारी, संसदेतील सुरक्षा पथकांचे सदस्य
विधिमंडळात यांना मिळेल पास : आमदार, आमदाराचे सहाय्यक, विधिमंडळाचे अधिकारी – कर्मचारी, विधिमंडळातील सुरक्षा पथकांचे सदस्य
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.