विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी काँग्रेस २, राष्ट्रवादी १, शेकाप १ आणि शिवसेना १ जागेवर निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसने नागपूर येथे असलेला पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेला बहाल केला आहे.
“अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरला तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालं आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.