मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी या दोन्ही पक्षांच्या युतीवर काही दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते अखेर या दोन्हीं पक्षांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवाडे यांच्यासोबत युती केल्यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करून बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेला दोन्ही पक्षाचे पद अधिकारी उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “जोगेंद्र कवाडे यांच्या रिपब्लिकन पिपल्स पार्टीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आमचे कवाडे यांच्यासोबत आधीपासूनच चांगले संबंध होते. बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पिपल्स पार्टी हे दोन्ही पक्ष मोठ्या संघर्षातून पुढे आले आहेत. आमच्या पक्षाने देखील साधा संघर्ष केलेला नाही. आता दोन्ही पक्ष सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार आहेत.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तर यावेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की , ” मुख्यमंत्री अतिशय धाडसी मुख्यंमत्री आहेत. तळागाळातून संघर्ष करून ते पुढे आले आहेत.
मी राज्यात अनेक ठिकाणी फिरलो आणि त्यावेळी राज्यातील लोकांमध्ये काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेलं शिंदे फडणवीस सरकार हे सर्व सामान्य लोकांचं सरकार असल्याची भावना जनतेत पाहायला मिळाली. जर आघाडी करायचीच असेल तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशीच करायची असं मत आमच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्रितपणे लढणार आहेत.” असे कवाडे यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.