Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…

एका तरुणाने पहिली नोकरी फक्त तीन तासांत सोडल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.
Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…

Viral Story: आजची तरुण पिढी करिअरबाबत आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक सजग, आत्मविश्वासू आणि स्पष्टविचारी आहे. केवळ नोकरी मिळाली म्हणून तडजोड करायची नाही, तर दीर्घकालीन संधी, प्रगती, मानसिक आरोग्य आणि योग्य मोबदला यांचा समतोल साधणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या एका अनोख्या प्रकरणाने तरुणाईचा बदलता दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आणला आहे.

एका रेडिट वापरकर्त्याने आपल्या पहिल्या नोकरीचा अनुभव शेअर केला. त्यानुसार एका तरुणाने नुकतीच नवी नोकरी जॉईन केली, पण केवळ तीन तासांत त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ही पोस्ट व्हायरल होताच इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली. काहींना त्याचा निर्णय धाडसी वाटला तर काहींना तो बेफिकीरपणाचा ठरला.

तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, ही नोकरी वर्क फ्रॉम होम होती. कामाचा ताण कमी असला तरी 9 तासांची पूर्णवेळ शिफ्ट आणि अंदाजे 12 हजारांचा मासिक पगार ही अट त्याला स्वीकारार्ह नव्हती. विशेष म्हणजे कंपनीने सुरुवातीला ही नोकरी पार्ट-टाईम म्हणून जाहिरात केली होती. परंतु त्याच्या हातात दिलेले ऑफर लेटर मात्र फुल-टाईम शिफ्टचे होते. याच विसंगतीमुळे त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं तो सांगतो.

तो म्हणतो, “मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. मला पार्ट-टाईम हवे होते, ज्यात वेळ व्यवस्थापन जमेल. पण तीन तास काम करताना मला कळलं की ही नोकरी मला काहीच नवीन देणार नाही आणि माझ्या करिअरच्या उद्दिष्टांपासून मला दूर नेईल. त्यामुळे तडजोड करण्यापेक्षा लगेच निर्णय घेणं योग्य वाटलं.”

या पोस्टनंतर प्रतिक्रिया दोन टोकांना विभागल्या गेल्या. एका गटाने या तरुणाचं कौतुक करत लिहिलं की, “स्वतःच्या मर्यादा आणि प्राधान्यं स्पष्ट ठेवणं ही धाडसाची गोष्ट आहे. सुरुवातीलाच ‘नो’ म्हणायला शिकलं पाहिजे.” अनेकांनी त्याचा खुला दृष्टिकोन प्रेरणादायी असल्याचं म्हटलं.

मात्र टीकाकारांचं मत वेगळंच. “करिअरच्या सुरुवातीला इतकी कडक भूमिका घेणं योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी अनुभवासाठी तरी काही दिवस नोकरी टिकवायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली. एका वापरकर्त्याने तर लिहिलं, “प्रत्येक दिवस आनंदी नसतो. तडजोड आणि संयम हेही करिअरचा भाग असतात.”

या वादातून मात्र एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. करिअरच्या सुरुवातीला आपली उद्दिष्टं स्पष्ट ठेवणं महत्त्वाचं की अनुभवासाठी तडजोड करणं गरजेचं? बदलत्या कार्यसंस्कृतीत तरुणांचे प्राधान्यक्रम बदलत असले तरी स्थिरता आणि प्रगती दोन्ही गोष्टींचा विचार करणं काळाची गरज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version