महाराष्ट्रातील सहकारी बँकांवरील कारवाईचा धडाका कायम असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आर्थिक गैरव्यवहार, बोगस कर्जप्रकरणे आणि कमकुवत आर्थिक स्थितीमुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे बँकेच्या हजारो ठेवीदारांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कराड-फलटण परिसरात कार्यरत असलेल्या यशवंत सहकारी बँकेचं नाव गेल्या काही वर्षांपासून आर्थिक घोटाळ्यांमुळे चर्चेत होतं. बँकेच्या व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आधीच निर्बंध लादले होते. गेल्या वर्षभरापासून ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. अखेर आता बँकेचा परवानाच रद्द करण्यात आला आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नव्हते. तसेच उत्पन्नाचे स्थिर स्रोत नसल्याने बँक पुढे चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले अनेक आर्थिक निकषही बँक पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे सर्व बँकिंग व्यवहार तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणामागील सर्वात मोठं कारण म्हणजे तब्बल 112 कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार. 2014 ते 2025 या कालावधीत बँकेच्या संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने अनेक बोगस व्यवहार केल्याचा आरोप आहे. तपासात तब्बल 195 बनावट खाती उघडण्यात आल्याचे समोर आले. या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद कर्जे वितरित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या गैरव्यवहारामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला. ठेवीदार आणि सभासदांच्या पैशांचा अपहार झाल्याचा आरोपही तपासात समोर आला आहे. या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 50 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना याआधी अटक करण्यात आली होती. ते राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्षदेखील होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील चौकशी सुरू केली होती.
आरबीआयच्या या निर्णयामुळे राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. ठेवीदारांचे पैसे कितपत सुरक्षित राहतील, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा अभाव सहकारी बँकांसाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचं हे आणखी एक मोठं उदाहरण मानलं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.