देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या काही दिवसांत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून वाहनधारकांची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे इंधन दरवाढीचा परिणाम आता थेट ग्राहकांवर दिसू लागला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतरच या वाढीची मालिका सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
15 मे रोजी सर्वप्रथम पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलमध्ये 3.11 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 20 मे रोजी दुसऱ्यांदा दरवाढ जाहीर झाली. त्या वेळी पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महागले होते. आता शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढले आहेत. ताज्या वाढीनुसार पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलमध्ये 91 पैशांची भर पडली आहे.
या नव्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलसाठी नागरिकांना 95.02 रुपये मोजावे लागत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्येही इंधनाचे दर 109 ते 110 रुपयांच्या घरात गेले आहेत.
परभणीत पेट्रोल 110.45 रुपये तर डिझेल 97.02 रुपयांवर गेले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 109.71 रुपये आणि डिझेल 96.26 रुपये दराने विकले जात आहे. वाशीममध्ये पेट्रोल 109.79 रुपये आणि डिझेल 96.39 रुपये इतके झाले आहे. कोल्हापूर, अमरावती, भंडारा आणि सोलापूरमध्येही इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला होता. निवडणुकांनंतर केंद्र सरकारने या वाढीचा काही भार ग्राहकांवर टाकल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाईही जाणवू लागली आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशीममध्ये अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. काही ठिकाणी इंधन पुरवठा कमी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही वाढ झाली असून प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर पोहोचला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम आता वाहतूक खर्च, भाजीपाला, मालवाहतूक आणि दैनंदिन वस्तूंवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.