नवी दिल्ली: डॉलरच्या तुलनेत सतत घसरत असलेल्या रुपयाला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र आज सोमवारी बाजार उघडताच रुपया एका दिवसात सुमारे 1.15 रुपयांनी मजबूत झाला. या अचानक झालेल्या मजबुतीमागे भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India, RBI) चा कडक निर्णय कारणीभूत ठरला आहे.
RBI ने बँकांना डॉलर-रुपया व्यवहारातील त्यांची ‘नेट ओपन पोझिशन’ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी बँकांना त्यांच्या टियर-1 भांडवलाच्या 25 टक्क्यांपर्यंत डॉलरची खुली पोझिशन ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे अनेक बँका मोठ्या प्रमाणावर डॉलर होल्ड करत होत्या आणि रुपयावर दबाव वाढत होता. आता RBI ने ही मर्यादा दररोज 100 मिलियन डॉलरपर्यंत आणली आहे.
या निर्णयामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात डॉलर विकून रुपया खरेदी करावा लागणार आहे. अंदाजानुसार सुमारे 30 ते 40 बिलियन डॉलरची पोझिशन कमी करावी लागेल. यामुळे बाजारात रुपयाची मागणी वाढून त्याला तात्काळ बळ मिळाले आहे.
रुपयावरील दबाव वाढण्यामागे अनेक कारणे होती. पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा दर वाढले, तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. यामुळे रुपया 94.82 या नीचांकी पातळीपर्यंत घसरला. RBI यापूर्वी विदेशी चलन साठ्यातून डॉलर विकून परिस्थिती सांभाळत होता, मात्र त्यामुळे साठ्यात मोठी घट झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर RBI ने थेट हस्तक्षेप करण्याऐवजी बँकांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्याचा मार्ग निवडला. या निर्णयामुळे रुपयावरील सट्टेबाजी कमी होण्याची शक्यता आहे आणि चलनातील अस्थिरताही कमी होईल. मात्र काही बँकांनी या नियमासाठी मुदतवाढ किंवा सवलत देण्याची मागणी केली आहे, कारण इतक्या कमी वेळेत पोझिशन कमी केल्यास त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो.
एकूणच, RBI चा हा निर्णय रुपयासाठी तात्पुरता दिलासा देणारा ठरत आहे. मात्र दीर्घकालीन स्थैर्यासाठी कच्च्या तेलाचे दर, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ हे घटक निर्णायक ठरणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय गेल्या दशकातील सर्वात कठोर उपायांपैकी एक असून यामुळे चलन बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.