महागाईच्या झटक्याने सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना आता आणखी एक मोठा फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता पाव आणि ब्रेडच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील अनेक खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढ, दूध महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक चिंतेत असतानाच आता पावाच्या दरातही वाढ झाली आहे. आजपासून सहा पावांच्या एका लादीमागे तब्बल 5 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वडापाव, मिसळपाव, भाजीपाव यांसारख्या पदार्थांच्या किंमतीही वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्रेड आणि पाव उत्पादक कंपन्यांनी वाढत्या उत्पादन खर्चामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले आहे. कच्चा माल आयात करण्यासाठी लागणारा खर्च, पॅकेजिंगचा वाढलेला खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त खर्च यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे आयात खर्च आणखी वाढत असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे.
16 मे रोजी मॉडर्न ब्रेड कंपनीने आपल्या बेसिक प्रकारातील पाव आणि ब्रेडच्या किंमती वाढवल्या. या निर्णयानंतर इतर मोठ्या कंपन्यादेखील दरवाढीच्या तयारीत असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. ब्रिटानिया आणि विब्ससारख्या कंपन्याही लवकरच त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या दरवाढीचा परिणाम फक्त घरगुती ग्राहकांवरच नाही, तर लहान हॉटेल्स, बेकरी व्यवसाय आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही होणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या वडापावच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महागाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना आता रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आगामी काळात इतर खाद्यपदार्थांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.