Bluetooth Scam: Bluetooth सतत चालू ठेवल्याने बँक खाते धोक्यात? सायबर ठगांचा नवा फंडा जाणून घ्या

स्मार्टफोनचे Bluetooth सतत चालू ठेवणे धोकादायक ठरू शकते. गर्दीच्या ठिकाणी सायबर ठग Bluetoothच्या माध्यमातून डेटा व बँकिंग माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. योग्य काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.
Bluetooth Scam: Bluetooth सतत चालू ठेवल्याने बँक खाते धोक्यात? सायबर ठगांचा नवा फंडा जाणून घ्या

Bluetooth scam: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनशिवाय आपला दिवस सुरूही होत नाही. कॉल, मेसेज, ऑनलाइन व्यवहार, UPI, बँकिंग अ‍ॅप्स सगळं काही फोनवर अवलंबून आहे. अशातच अनेकजण इअरबड्स, स्मार्टवॉच किंवा कार कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth सतत चालू ठेवतात. मात्र, ही सवय तुमच्यासाठी मोठा धोका ठरू शकते, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी Bluetooth अनावश्यकपणे सुरू ठेवणे म्हणजे सायबर ठगांसाठी उघडं आमंत्रणच. बस, लोकल ट्रेन, मॉल, बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी काही सेकंदांतच तुमचा फोन हॅक होऊ शकतो. यामुळे तुमची वैयक्तिक माहितीच नव्हे, तर बँकिंग डिटेल्सही धोक्यात येऊ शकतात.

Bluetooth मुळे नेमका धोका काय?

Bluetooth चालू असल्यास तुमचा फोन आसपासच्या डिव्हाइसना “दिसतो”. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार ‘ब्लूजॅकिंग’, ‘ब्लूस्नार्फिंग’ किंवा ‘ब्लूबगिंग’सारख्या पद्धती वापरतात. या पद्धतींमध्ये हॅकर्स तुमच्या फोनला पेअरिंग रिक्वेस्ट पाठवतात. चुकून जरी तुम्ही ती विनंती स्वीकारली, तरी तुमच्या फोनवर त्यांचा प्रवेश मिळू शकतो.

एकदा प्रवेश मिळाल्यानंतर हॅकर्स तुमचे कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस, फोटो, ई-मेल्स आणि काही प्रकरणांत बँकिंग अ‍ॅप्समधील संवेदनशील माहितीही मिळवू शकतात. काही वेळा OTP, UPI व्यवहार किंवा सेव्ह केलेले पासवर्डही त्यांच्या हाती लागू शकतात. याचा परिणाम म्हणजे काही मिनिटांतच खाते रिकामे होण्याचा धोका.

गर्दीची ठिकाणं का असतात टार्गेट?

सायबर ठग बहुतेक वेळा गर्दीची ठिकाणं निवडतात कारण तिथे अनेक Bluetooth डिव्हाइस एकाच वेळी सक्रिय असतात. विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने ते आसपासचे फोन स्कॅन करतात आणि कमकुवत सिक्युरिटी असलेल्या डिव्हाइसला लक्ष्य करतात. यामध्ये वापरकर्त्याला कळतही नाही आणि डेटा चोरी होऊन जाते.

स्वतःचे संरक्षण कसे कराल?

थोडीशी काळजी घेतली, तर हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. सायबर तज्ज्ञ काही सोप्या उपायांचा सल्ला देतात:

  • काम पूर्ण झाल्यावर Bluetooth त्वरित बंद करा

  • सार्वजनिक ठिकाणी Bluetooth शक्यतो बंद ठेवा

  • अज्ञात किंवा संशयास्पद पेअरिंग रिक्वेस्ट कधीही स्वीकारू नका

  • फोनचे Bluetooth ‘नॉन-डिस्कव्हेबल’ मोडमध्ये ठेवा

  • फोन आणि अ‍ॅप्स नेहमी अपडेट ठेवा

Bluetooth हे उपयुक्त फीचर असले तरी निष्काळजीपणे वापरल्यास तेच तुमच्यासाठी घातक ठरू शकते. काही सेकंदांची सावधगिरी तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. त्यामुळे पुढच्यावेळी इअरबड्स काढल्यानंतर किंवा फाइल शेअरिंग पूर्ण झाल्यावर Bluetooth बंद करायला विसरू नका—कारण तुमची सुरक्षितता तुमच्याच हातात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version