Know about Thalapathy Vijay Family : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपल्या ‘टीव्हीके’ पक्षाद्वारे 100 हून अधिक जागांवर आघाडी घेत थलपती विजयने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 22 जून 1974 रोजी चेन्नईत जन्मलेल्या विजयचा ओढा चित्रपटसृष्टीकडे असणे स्वाभाविक होते, कारण त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहेत. त्यांनी सामाजिक विषयांवर 70 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून विजयच्या सुरुवातीच्या कारकिर्दीला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ख्रिश्चन धर्मीय चंद्रशेखर आणि हिंदू पार्श्वभूमी असलेल्या त्यांच्या पत्नी शोभा चंद्रशेखर यांचे हे आंतरधर्मीय कुटुंब आहे.
गायिका आई, बहीणही होती.. पण..
विजयच्या आई शोभा चंद्रशेखर या केवळ एक लेखिकाच नाहीत, तर त्या प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि संगीतकारही आहेत. कुटुंबातील या सांगीतिक वातावरणामुळे विजयच्या व्यक्तिमत्त्वावर तशाच प्रकारचे संस्कार झाले. विजयच्या आयुष्यात एक दु:खद छटा देखील आहे; त्याला विद्या चंद्रशेखर नावाची एक धाकटी बहीण होती. मात्र, दुर्दैवाने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी तिचे निधन झाले. आपल्या बहिणीची आठवण विजय आजही जपून आहे. जोसेफ विजय चंद्रशेखर हे त्याचे पूर्ण नाव असून त्याने आपल्या पालकांचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे.
वैवाहिक जीवन आणि मुलांचा प्रवास
विजयच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, 25 ऑगस्ट 1999 रोजी त्याचे लग्न संगीता सोरनलिंगम हिच्याशी झाले होते. संगीता ही मूळची श्रीलंकेची असून लंडनमध्ये स्थायिक होती आणि विजयची मोठी चाहती होती. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रीतीरिवाजांनी विवाह केला होता. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साथा ही दोन मुले आहेत. जेसनचा जन्म 26 ऑगस्ट 2000 मध्ये झाला असून त्याने वडिलांच्या चित्रपटात काही भूमिकाही केल्या आहेत, तर दिव्याचा जन्म 2005 मध्ये झाला आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता.
राजकीय वळण आणि नवीन ओळख
कलेचा वारसा आणि कौटुंबिक पाठबळ असलेल्या विजयने आता अभिनयाकडून थेट जनसेवेकडे पाऊल वळवले आहे. त्याच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत मिळवलेले यश हे केवळ त्याच्या स्टारडमचे नाही, तर त्याच्या संघर्षाचे फळ मानले जात आहे. तामिळनाडूच्या राजकारणात ‘किंग’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विजयच्या या प्रवासात त्याच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याच्या वडिलांनी दिलेल्या सुरुवातीच्या संधींचा मोठा वाटा आहे. चित्रपटात 70 हून अधिक सिनेमे देणाऱ्या वडिलांचा मुलगा आता राजकारणाच्या पडद्यावर कोणती भूमिका बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय थलपती यांचा राजकारणातला डेब्यू ‘सुपरहिट’; या 7 घोषणा ठरल्या गेमचेंजर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.