Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आता वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीमुळे पूर किंवा पाणी साचल्याने झालेले नुकसान या दोन नव्या प्रकारच्या पिकांच्या नुकसानांचा समावेश करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका निवेदनाद्वारे दिली. आतापर्यंत या दोन्ही प्रकारच्या नुकसानींना विमा भरपाई मिळत नव्हती, मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून केंद्राने धोरणात मोठा बदल केला आहे.
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान होत असले तरीही आता त्यांना पीक विम्याअंतर्गत भरपाई मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हरण, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांमुळे मोठे नुकसान सोसावे लागते. या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – PM Kisan Yojana : तुमचे पीएम किसान पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत का? हे कारण असू शकते
अतिवृष्टी, पूर व पाणी साचल्याने झालेल्या नुकसानीचीही भरपाई
चौहान पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे पूर किंवा पाणीसाठ्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरीही भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांच्या मोठ्या मागणीला केंद्राने मान्यता दिली आहे. अनेक राज्यांमध्ये अति पावसामुळे पिके पूर्णपणे नष्ट होत असतात. या भरपाईचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळेल. तथापी, कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने काढण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वन्य प्राणी व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होणे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या होती. आता या नुकसानीवरही विमा कवच उपलब्ध झाल्याने शेतकरी अधिक निर्धास्तपणे शेती करू शकतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.