नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (17 मार्च 2026) रोजी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या संभाषणादरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
या चर्चेत स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीच्या हालचालीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. जगातील ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. तसेच या भागात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी परस्पर सहकार्य कायम ठेवण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टद्वारे दिली. त्यांच्या संदेशात त्यांनी नमूद केले की, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवरही विचारविनिमय झाल्याचे त्यांनी सांगितले.
Spoke with my brother HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, President of the UAE and conveyed advance Eid greetings. We discussed the current situation in West Asia. Reiterated India’s strong condemnation of all attacks on the UAE that have resulted in loss of innocent lives… — Narendra Modi (@narendramodi) March 17, 2026
पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेला असून नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या हिंसक घटनांचा भारत कठोर शब्दांत विरोध करतो. यासोबतच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील जहाजांची सुरक्षितता यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका दाव्याचे भारत सरकारने स्पष्टपणे खंडन केले आहे. या वृत्तांनुसार स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारताने जप्त केलेले तीन तेलवाहू टँकर सोडण्याची मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले जात होते. मात्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले असून भारत आणि इराण यांच्यात अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले आहे.
सध्या भारत स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून 20 पेक्षा अधिक भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तेहरानशी सातत्याने संपर्कात आहे. दोन्ही देशांमधील चर्चेनंतर शनिवारी पहाटे भारतीय ध्वज असलेली दोन एलपीजी वाहक जहाजे, शिवालिक आणि नंदा देवी यांनी 92712 मेट्रिक टन एलपीजी घेऊन सुरक्षितपणे स्ट्रेट ऑफ होर्मुज पार केला. त्यामुळे या संवेदनशील समुद्री मार्गावर भारतीय जहाजांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.