नवी दिल्ली: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी अवघ्या 15.2 षटकांत हे लक्ष्य पूर्ण करत सर्वांनाच चकित केले.
भारतीय संघाची फलंदाजी इतकी आक्रमक होती की, रायपूरच्या या खेळपट्टीवर भारत 250 धावांचे लक्ष्यही सहज गाठू शकला असता, असे चित्र सामन्यादरम्यान दिसून आले. पहिल्या चेंडूपासूनच भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव टाकला. त्यामुळे 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य असूनही सामना एकतर्फी ठरला.
सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याला भारताविरुद्ध किती धावा सुरक्षित ठरतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत तो म्हणाला, “या संघाविरुद्ध? मला वाटतं 300 धावा कदाचित पुरेशा ठरतील.” भारताची फलंदाजी पाहता आता 200 किंवा 210 धावा अजिबातच सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असेही त्याने स्पष्टपणे मान्य केले.
भारताच्या फलंदाजीबाबत बोलताना सॅन्टनर म्हणाला की, भारतासारख्या संघासमोर खेळताना पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकतेची अपेक्षा असते. प्रत्येक फलंदाजाला आपली नैसर्गिक खेळी करण्याची मोकळीक मिळते आणि त्यामुळे विरोधी संघासाठी दबाव निर्माण करणे कठीण होते. तरीही न्यूझीलंड संघ शक्य तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न करत राहील, असे त्याने सांगितले.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सॅन्टनर म्हणाला की, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही धावा काढणं त्याच्याकडून अपेक्षित असते. खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय चांगली होती आणि आऊटफिल्डही जलद असल्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. महत्वाच्या विकेटवर गोलंदाजी करावी लागत असल्याने फलंदाजीतील योगदान महत्त्वाचे ठरते, असेही तो म्हणाला.
सामन्यातील दवाबाबत बोलताना न्यूझीलंडच्या कर्णधाराने मान्य केले की, दव साचल्यामुळे विशेषतः फिरकी गोलंदाजांना अडचणी येतात. चेंडू पकडणे कठीण होते, मात्र रायपूरमध्ये तुलनेने थंडी अधिक असल्याने परिस्थिती थोडी वेगळी होती. पुढील सामन्यांसाठी संघ परिस्थितीशी जुळवून घेईल आणि जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास सॅन्टनरने व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.