देशभरात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून उत्तर, मध्य आणि पूर्व भारत अक्षरशः तापून निघाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत जगातील सर्वाधिक उष्ण असलेल्या १०० शहरांच्या यादीत तब्बल ९७ शहरे भारतातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
AQI.in या संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी साडेदोनच्या सुमारास ओडिशातील बलांगीर हे शहर जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले. येथे तापमान तब्बल ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. बिहारमधील सासाराम आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथेही ४८ आणि ४७ अंश तापमानाची नोंद झाली.
या यादीत भारतातील अनेक शहरांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर, अयोध्या, आग्रा, पंजाबमधील पतियाळा, तेलंगणातील वारंगल, उत्तराखंडमधील हरिद्वार, राजस्थानातील श्रीगंगानगर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि सिंगरौली, झारखंडमधील धनबाद, तसेच चंदीगडमध्येही तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आले.
विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत भारताबाहेरील केवळ तीनच शहरे होती आणि ती सर्व नेपाळमधील होती. धनगढी, नेपाळगंज आणि लुंबिनी संस्कृतिक या शहरांमध्ये तापमान ४५ ते ४६ अंशांच्या आसपास होते.
अत्यंत कमी आर्द्रता आणि प्रखर उन्हामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. काही भागांत आर्द्रतेचे प्रमाण ६ ते ८ टक्क्यांपर्यंत खाली गेले असून त्यामुळे हवामान ‘एक्स्ट्रीम हॉट’ श्रेणीत गेले आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने दुपारी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेशात उष्णतेशी संबंधित आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात ३०० हून अधिक संशयित उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जवळपास एकतृतीयांश रुग्ण हे मे महिन्यात आढळले आहेत.
उष्माघातामुळे चक्कर येणे, उलट्या, गोंधळ, शुद्ध हरपणे, झटके येणे आणि गंभीर अवस्थेत अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये २२ मे ते २७ मेदरम्यान तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. गुजरातसारख्या काही राज्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असून रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन आणि अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
हवामान विभागाच्या निकषांनुसार, मैदानी भागात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आणि ते सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी जास्त राहिले तर उष्णतेची लाट घोषित केली जाते. तापमान ४५ अंशांवर पोहोचल्यास परिस्थिती अधिक गंभीर मानली जाते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.