VIP Number Plate Auction again : वाहन खरेदी केल्यानंतर अनेकजण व्हीआयपी (VIP) किंवा फॅन्सी क्रमांकासाठी (Fancy Number) आग्रही असतात आणि त्यासाठी मोठी किंमत मोजायला तयार असतात. हरियाणातील असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. HR88B8888 या व्हीआयपी नंबरप्लेटसाठी (VIP Number Plate) तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली लागली होती. ही बोली भारतातील सर्वात महागडी वाहन क्रमांक (Vehicle Number) बोली ठरली होती. मात्र, आता एका कारणामुळे या क्रमांकासाठी पुन्हा एकदा लिलाव (Auction) केला जाणार आहे.
बोली लावणारा व्यक्ती रक्कम भरण्यात अपयशी
हा क्रमांक रोम्युलस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचेसंचालक सुधीर कुमार यांनी विकत घेतला होता. त्यांनी दोन दिवस ऑनलाईन (Online) बोली लावल्यानंतर HR88B8888 या नंबरप्लेटसाठी तब्बल 1,17,75,000 रुपयांची बोली लावली होती. नियमांनुसार, लिलावात बोली लावल्यानंतर सुधीर कुमार यांना ही बोली लावलेली रक्कम 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जमा करायची होती. मात्र, सुधीर कुमार यांना ही रक्कम जमा करण्यात अपयश आले. त्यांनी रक्कम भरण्याचा दोनदा प्रयत्न केला, पण तांत्रिक (Technical) कारणामुळे त्यांना ती जमा करता आली नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या कुटुंबाकडूनही या नंबरप्लेटसाठी विरोध झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुन्हा होणार लिलाव
सुधीर कुमार यांना HR88B8888 साठीचे शुल्क (Fee) जमा करण्यात अपयश आल्यामुळे, या क्रमांकासाठी आता पुन्हा बोली लावली जाणार आहे. हरियाणात व्हीआयपी क्रमांकांसाठी आठवड्यात ऑनलाईन लिलाव केला जातो. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 पर्यंत असते. त्यानंतर सलग दोन दिवस बोली लावली जाते आणि निकाल बुधवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर केला जातो. गेल्या आठवड्यात HR88B8888 साठी किमान रक्कम 50 हजार रुपये असूनही तब्बल 45 जणांनी बोली लावली होती आणि सर्वात मोठी बोली 1 कोटी 17 लाख रुपयांची लागल्याने जोरदार चर्चा झाली होती.
क्रमांकाचे वैशिष्ट्य काय?
HR88B8888 या क्रमांकाचे वैशिष्ट्य म्हणजे, HR हे हरियाणा राज्याचे (State) प्रतिनिधित्व करते, 88 हा आरटीओ विभाग किंवा जिल्ह्याचा क्रमांक दर्शवतो, तर B हा सिरीजचा क्रमांक '8' या अंकासारखा दिसतो. तसेच, यामध्ये चार वेळा 8888 हा क्रमांक आल्याने याला मोठी मागणी होती. आता या क्रमांकासाठी पुन्हा बोली लागणार असून, यावेळी हा व्हीआयपी नंबर कोण जिंकतो आणि ती मोठी रक्कम वेळेत भरू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.