रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या युद्धात झालेल्या रशियाच्या नुकसानाची आकडेवारी युक्रेनकडून जाहीर करण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या झालेल्या नुकसानाची आकडेवारी युक्रेनकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच ८ मार्चपर्यंत रशियाचे युद्धात काही प्रमाणात नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले आहे. युक्रेनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत रशियाचे १२ हजारांहून अधिक सैनिक मरण पावले आहेत. तसेच ३०३ टँक, १०३६ लढाऊ वाहने, १२० तोफा, २६ मल्टी-लाँच रॉकेट सिस्टीम, २७ हवाई संरक्षण स्थळे, ४८ विमाने, ८० हेलिकॉप्टर, ४७४ ऑटोमोटिव्ह शस्त्रे, ३ जहाजे, ६० इतर यूएव्ही टँक आणि ७ यूएव्ही वाहने नष्ट करण्यात आली असल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे.
रशिया-युक्रेनमध्ये तीव्र लढाई सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, रशिया-युक्रेनमध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चासुद्धा निष्फळ ठरली आहे. युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्य पोडोलीक यांनी सांगितले की, परिस्थितीत सुधारणा होईल असे काही ठोस निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली नाही. मात्र, युद्धबंदी आणि सुरक्षेच्या हमीसह इतर मुद्द्यांवर चर्चा सुरूच राहणार आहे. तर रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख मेडिंस्की यांनी सांगितले की, युक्रेनसोबत झालेल्या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. राजकीय आणि लष्करी मुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.