नागपूर : आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय वायुसेनेचे सुखोई Su‑30MKI लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातात दोन्ही पायलट स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वायुसेनेने गुरुवारी मध्यरात्री 1 वाजून 9 मिनिटांनी विमानाचा अपघात झाल्याची पुष्टी केली होती. शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता आणखी एका X पोस्टमध्ये दोन्ही पायलटच्या मृत्यूची माहिती दिली. हा अपघात झाला तेव्हा लढाऊ विमान नियमित उड्डाणावर किंवा मोहिमेवर होते. याच दरम्यान त्याचा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटला होता
दरम्यान, या विमान अपघातात शहीद झालेला फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हा मूळचा नागपूरचा असून महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावल्याची भावना आहे. पूर्वेश हा काही दिवसांपूर्वी नागपूरात येऊन गेला होता. पूर्वेश सुरूवातीपासून खिलाडूवृत्तीच्या स्वभावाचा होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण-भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील रवींद्र दुरुगकर हे रेल्वेत होते. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. पूर्वेशच्या मृत्यूवर त्यांच्या वडिलांनी आणि भावाने दुःख व्यक्त केले आहे. त्याच्याविषयी बोलताना वडील रवींद्र दुरुगकर म्हणाले की, लहानपणापासून त्याला पुस्तके वाचनाची आवड होती. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्य तो आवर्जून वाचत असे. देशसेवेची प्रेरणा घेत त्याने वायूसेनेत दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शहीद पूर्वेश दुरुगकर देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत तत्परतेने काम करत होता, असे त्यांचे वडील रविंद्र दुरुगकर यांनी सांगितले. देशसेवेच्या कारणास्तव त्याने अनेक गोष्टी कुटुंबीयांनाही सांगितल्या नव्हत्या, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला दुःख झाले असले तरी मुलाचा अभिमान असल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली. देशातील तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तर फायटर विमान अपघातात पूर्वेश दुरुगकर शहीद झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भाऊ अथर्व दुरुगकर यांनी केली आहे. एक पायलट तयार व्हायला अनेक वर्षे लागतात आणि अशा अपघातात त्याला गमावावे लागतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, पूर्वेश असा अचानक जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.