Digital Arrest: अंत्यसंस्कार सुरू असतानाच वाजला मृत महिलेचा फोन; एका कॉलने उघड केला ‘डिजिटल अरेस्ट’चा थरारक खेळ

डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Digital Arrest: अंत्यसंस्कार सुरू असतानाच वाजला मृत महिलेचा फोन; एका कॉलने उघड केला ‘डिजिटल अरेस्ट’चा थरारक खेळ

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारीचा अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीमुळे एका 28 वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे तिच्या अंत्यसंस्कारावेळी आलेल्या एका फोन कॉलमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.बिजनोरमधील फरीदपूर भोगी गावात राहणारी मोनिका गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्ती तिला वारंवार फोन करून स्वतःला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत होते. तिच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली तिला धमकावले जात होते.

हेही वाचा: Kumbh Mela Girl Monalisa : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाची दिग्दर्शकासह विहिंपच्या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो दाखल

सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पोलीस गणवेशात बोलत तिच्यावर दबाव टाकला. तिला अटक होईल, कुटुंबीयांनाही अडचणीत आणू, अशी भीती दाखवून सतत मानसिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून मोनिकाने 27 ते 28 एप्रिलच्या रात्री स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेवेळी तिची दोन लहान मुले घरातच झोपलेली होती. सकाळी कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला सामाजिक दबावामुळे कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली नाही आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.

मात्र, स्मशानभूमीत अंतिम विधी सुरू असतानाच मोनिकाचा मोबाईल सतत वाजू लागला. तिच्या नातेवाईकाने फोन उचलताच समोरून एका व्यक्तीने पोलीस वेशातील व्हिडिओ कॉल केला. त्याने मोनिकाशी बोलण्याची मागणी केली. नातेवाईकांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतरही त्या व्यक्तीने कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.याच फोन कॉलमुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर हे ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले. सध्या पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा: Pune Bhor Crime : चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं, 65 वर्षीय नराधमाचं कृत्य; नागरिकांमध्ये प्रचंड संपात

‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे सायबर गुन्हेगारांकडून स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा अन्य सरकारी अधिकारी सांगून नागरिकांना भीती दाखवणे. बनावट प्रकरणे दाखवून पैसे उकळणे किंवा मानसिक दबाव टाकणे, हा त्यामागचा उद्देश असतो.या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही किंवा व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version