CJI Surya Kant : सरन्यायाधीशांचा रुद्रावतार! ‘सुप्रीम कोर्ट अदानी-अंबानींसाठी काम करते’ म्हणताच, वकिलाला अस्से खडसावले… की बस्स..

तातडीच्या सुनावणीसाठी प्रकरणांच्या नोंदणीवेळी ॲड. मॅथ्युज नेदुमपारा यांनी त्यांच्या याचिकेचा उल्लेख केला. त्याच वेळी त्यांनी अदानी-अंबानींशी संबंधित याचिका लगेच सूचिबद्ध केल्या जातात, असा आरोप...
CJI Surya Kant : सरन्यायाधीशांचा रुद्रावतार! ‘सुप्रीम कोर्ट अदानी-अंबानींसाठी काम करते’ म्हणताच, वकिलाला अस्से खडसावले… की बस्स..

CJI Surya Kant Angry with Lawyer Mathews Nedumpara : सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये सोमवारी एका वरिष्ठ वकिलाच्या विधानामुळे अभूतपूर्व तणाव निर्माण झाला. "सर्वोच्च न्यायालय केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करतेय की काय?" असे विधान ॲड. मॅथ्युज नेदुमपारा यांनी करताच सरन्यायाधीश सूर्य कांत प्रचंड संतापले. सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत वकिलाची कानउघाडणी करत, "माझ्या न्यायालयात बोलताना 100 वेळा विचार करून बोला," अशी कडक तंबी दिली. या नाट्यमय प्रसंगामुळे भरगच्च भरलेल्या कोर्टरूममध्ये काही काळ शांतता पसरली होती.

नेमका वाद काय होता?
सकाळच्या सत्रात तातडीच्या सुनावणीसाठी प्रकरणांची नोंदणी सुरू असताना ॲड. मॅथ्युज नेदुमपारा यांनी त्यांच्या याचिकेचा उल्लेख केला. त्यांनी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी (NJAC) संबंधित याचिका दाखल केली असून, ती अद्याप नोंदणीकृत झाली नसल्याचे सांगितले. याउलट, अदानी आणि अंबानी यांच्याशी संबंधित याचिका लगेच सूचिबद्ध केल्या जातात, असा आरोप नेदुमपारा यांनी केला. याच युक्तिवादादरम्यान त्यांनी "कोर्ट केवळ बड्या उद्योगपतींसाठी काम करतेय" असे विधान केल्याने सरन्यायाधीशांचा पारा चढला.

सरन्यायाधीशांचा कडक इशारा
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी वकिलाला मध्येच थांबवत ठणकावून सांगितले की, "अनावश्यक मुद्दे निर्माण करू नका. माझ्या कोर्टरूममध्ये बोलताना 100 वेळा विचार करा. तुम्ही मला चंदीगडमध्ये पाहिले आहे आणि आता दिल्लीतही पाहत आहात. ही फक्त एक ताकीद आहे, पुन्हा अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही." सरन्यायाधीशांच्या या रौद्ररूपामुळे नेदुमपारा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना थेट कारवाईचा इशारा देऊन गप्प केले.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात भक्तांना मिळणार ही खास सुविधा; 50 हजार भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

योगायोगाने आलेले रिलायन्सचे प्रकरण
विशेष म्हणजे, नेदुमपारा यांच्या याचिकेपूर्वीच अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित 'केजी बेसिन गॅस मायग्रेशन' वादाचे प्रकरण सुनावणीला आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, त्यावर सरन्यायाधीशांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. याच गोष्टीचा संदर्भ घेत नेदुमपारा यांनी भेदभाव होत असल्याचा दावा केला होता. मात्र, रजिस्ट्रीने तांत्रिक कारणास्तव त्यांची याचिका अद्याप छाननीसाठी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेदुमपारा यांचा जुना इतिहास
ॲड. मॅथ्युज नेदुमपारा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही तत्कालीन सरन्यायाधीशांनी त्यांना "न्यायालयात राजकीय भाषणे करू नका," अशी सज्जड ताकीद दिली होती. न्यायालयाच्या कामकाजावर गंभीर आरोप करणे आणि उद्योगपतींच्या नावाचा वापर करून न्यायपालिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, यावरून सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला. या प्रसंगानंतर वकिलांच्या वागणुकीबाबत आणि शिस्तीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – State Name Change: नावबदलाच्या उंबरठ्यावर दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य; कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय शक्य

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version