पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी काही घटना घडली, त्यावर विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पंतप्रधानांच्या पाठीशी भाजपा उभी असून पंतप्रधानांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तर पंतप्रधानांविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधानांवरील हल्ला म्हणजे देशावरील हल्ला. काँग्रेस नेते बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत त्यामुळे काँग्रेस नेत्यांची वक्तव्य ही निर्लज्जपणाचा कळस असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधानांसोबत इतकी मोठी घटना घडली असतानाही राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाही, याप्रकरणाची जितकी निंदा करावी तितकी कमी, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे घाणेरडे राजकारण आता जनतेपासून लपून राहिले नसून, कँग्रेसची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. काँग्रसची वक्तव्ये दिशाभूल करणारी आहेत, त्यामुळे दिशाभूल करणारी वक्तव्य करणाऱ्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली. याप्रकरणी सर्वस्तरावरून पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवरसुद्धा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना नियमावलीबाबत असमन्वयता असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच मविआ सरकारचे सर्व नेते नियम घोषित करत असातात तर कोरोना नियमावली घोषित करण्याआधी एकवाक्यता हवी, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मविआला दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.