Anuj Sachdeva: मुंबईतील गोरेगाव परिसरातून मनोरंजन विश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. एका साध्या पार्किंगच्या वादातून प्रकरण इतकं चिघळलं की, थेट प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर हल्ला करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्वतः अभिनेत्याने कॅमेरात कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गोरेगाव वेस्टमधील एका नामांकित सोसायटीत राहणारा टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. अनुजच्या म्हणण्यानुसार, सोसायटीच्या पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी उभी केलेली कार ही या वादाची सुरुवात ठरली. या संदर्भात त्याने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केवळ सूचना दिली होती. मात्र, ही सूचना संबंधित रहिवाशाच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातूनच हा हिंसक प्रकार घडल्याचा दावा अनुजने केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार, सोसायटीतीलच एक रहिवासी अनुजवर अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसतो. वाद वाढत गेल्यानंतर त्या व्यक्तीने काठी आणि लोखंडी रॉडने अनुजवर हल्ला केला. विशेष म्हणजे, या हल्ल्यादरम्यान अभिनेत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यातून रक्तस्राव होत असल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे पाहायला मिळतं.
इतकंच नव्हे तर, हल्लेखोराने अनुजच्या पाळीव कुत्र्यावरही रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब अधिकच संतापजनक असून, प्राणीप्रेमींसह अनेक नागरिकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोसायटीतील सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचा संताप कमी झाला नाही आणि त्याने हल्ला सुरूच ठेवल्याचं अनुजचं म्हणणं आहे.
ही घटना घडल्यानंतर अनुजने संबंधित व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत आपली भीती आणि असुरक्षितता व्यक्त केली आहे. “माझ्यावर हल्ला झाला असून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या किंवा माझ्या मालमत्तेला काहीही होण्याआधी हा पुरावा मी सर्वांसमोर ठेवत आहे,” अशा शब्दांत त्याने आपली भूमिका मांडली आहे. तसेच, संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणीही त्याने केली आहे.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकार, चाहते आणि सर्वसामान्य नागरिकांनी अनुजला पाठिंबा दर्शवला असून, सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून जर एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर महानगरातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.