कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून राज्यात सुरू झाले आहे. १ जानेवारीपासून मुलांची लसीकरण नोंदणी सुरू झाली असून सोमवारपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे.
कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात ४० केंद्रावर कोरोना लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्यासाठी केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. महापालिकेने सर्व केंद्रावर तयारी केली आहे. सकाळी १० वाजल्यापासून लसीकरणाला या केंद्राला सुरवात झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरवात झाली.
कोल्हापूरमध्ये मुलांच्या लसीकरणाला सुरवात झाली असून मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी लसीकरण केंद्रावर भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार मुलांचे लसीकरण होणार असून महापालिका हद्दीतील २८ हजार मुलांचे दहा दिवसांत लसीकरण पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभास देसाई यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात करण्यात आली. औरंगाबाद महापालिकेने दोन शाळा आणि चार आरोग्य केंद्रात ठिकाणी लसीकरण सुरु केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.