मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या वेबसीरिजनं धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात जाऊन सिनेमे पाहण्याऐवजी प्रेक्षकांना ओटीटीवरील सिनेमे आणि वेबसीरिज अधिक आकर्षित करत आहेत. तसेच निर्मातेदेखील वैविध्यपूर्ण विषयांनी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र अशातच मराठीतील देवखेळ या झी 5 वरील मराठी वेबसीरिजवर बंदीची मागणी होताना दिसत आहे. या संबंधीत राज्याच्या माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे. देवखेळे या वेबसिरिजमुळे महाराष्ट्र शासन जतन संवर्धन करीत असलेल्या “नमन-खेळे” या पौराणिक व खूप जुन्या हिंदू लोककलेला व परंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. त्या विरोधात कोकणात रोष वाढत असून वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे. मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण काही दिवसांवर आला असताना अशाप्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी लक्ष द्यावे म्हणून तातडीने लक्ष वेधले आहे, अशा आशयाची एक्स पोस्ट आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच सोबत त्यांनी पत्राची प्रतदेखील जोडली आहे.
हेही वाचा : Ghooskhor Pandat : मनोज तिवारीचा ‘घुसखोर पंडित’ अडचणीत, नेमकं कारण काय?
काय आहे प्रकरण
झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘देवखेळ’ वेब सीरिजच्या टीझरमधून गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर देवाबाबत अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रोमो तात्काळ हटवा अन्यथा कार्यालयापर्यंत येऊ, असा इशारा काही दिवसांपूर्वी गुहागरमधील नागरिकांनी दिला होता. यासंदर्भात गुहागर पोलीस स्थानकातदेखील लेखी स्वरूपात तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. आपलं गुहागर या सामाजिक व्यासपीठाच्या वतीनं गुहागर पोलीस ठाण्यात बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार ॲड. संकेत अरुण साळवी, प्रेसिडेंट–गुहागर बार असोसिएशन आणि आपलं गुहागरचे समन्वयक यांनी 28 जानेवारी रोजी गुहागर पोलीस निरीक्षकांकडे सादर केली आहे. तक्रारीनुसार या वेब सीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः “शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे”, अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. शंकासूर देव हे गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून, शिमगोत्सव काळात हजारो भाविक श्रद्धेनं उपासना करतात.
झी 5 वरिल "देवखेळे" या वेबसिरिज मुळे महाराष्ट्र शासन जतन संवर्धन करीत असलेल्या "नमन-खेळे" या पौराणिक व खूप जुन्या हिंदू लोककलेला व परंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. त्या विरोधात कोकणात रोष वाढत असून वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे.… pic.twitter.com/agqqWiJHxN — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 7, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.