Amol Kolhe: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका बंद होणार; अमोल कोल्हेंनी सांगितलं मोठं कारण

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मराठी मालिका 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Amol Kolhe: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका बंद होणार; अमोल कोल्हेंनी सांगितलं मोठं कारण

मराठी टेलिव्हिजनवरील चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित या मालिकेचा शेवट १४ जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मालिका संपत असली तरी फुले दाम्पत्याची कहाणी इथेच थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत निर्माते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले आहेत.

समाजातील जातीभेद, स्त्री शिक्षणावरील बंदी, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात लढा देत सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी उभं केलेलं कार्य या मालिकेतून दाखवण्यात आलं. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. मात्र आता ही मालिका अचानक बंद होणार असल्याने अनेक चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या समाप्तीमागचं कारण स्पष्ट केलं. त्यांच्या मते, मालिकेचा खर्च आणि त्यातून मिळणारा महसूल यांचं गणित जुळत नसल्याने वाहिनीकडून हा निर्णय घेण्यात आला. “गोष्ट जिथून खऱ्या अर्थाने सुरू होते, तिथेच मालिका थांबतेय, हे दुर्दैवी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

फुले दाम्पत्यावर आधारित ही मालिका फक्त १५२ भागांमध्ये संपणार असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. “आपण महात्मा फुले यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना त्यांच्या कार्यावर आधारित मालिका इतक्या लवकर संपणं योग्य नाही,” असंही त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांनी चाहत्यांना आश्वस्त करत सांगितलं की, फुले दाम्पत्याची कथा नव्या माध्यमातून आणि नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या मालिकेतील बहुतांश कलाकार आणि टीम त्याच प्रकल्पात सहभागी असतील.

या मालिकेला सुरुवातीपासून वाहिनीतील काही वरिष्ठांनी मोठा पाठिंबा दिल्याचंही त्यांनी सांगितलं. सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर आणि अभिजीत खाडे यांनी या मालिकेसाठी विशेष प्रयत्न केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र अंतिम निर्णय घेणाऱ्या स्तरावरील विचारप्रणाली काय आहे, हे सांगणं कठीण असल्याचं त्यांनी नमूद केलं.

टीआरपीच्या मुद्द्यावरही अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं. त्यांच्या मते, केवळ टीव्हीवरील प्रसारणाचा टीआरपी मोजला जातो, पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मालिका पाहतात, त्याची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे फक्त टीआरपीच्या आधारे मालिकेचं यश ठरवणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा:Suman Kalyanpur: मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील गाण्यांनी रसिकांना वेड लावणाऱ्या सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ यांसारख्या मालिकांचा उल्लेख करत त्यांनी “अशा मालिकांचं जतन मूल्य खूप मोठं असतं. त्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात,” असं सांगितलं.

मालिका संपणार असली तरी फुले दाम्पत्याच्या कार्याची प्रेरणा कायम राहणार असून, नव्या मंचावर त्यांची कहाणी पुन्हा जिवंत होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version