मुख्यमंत्र्यांनी भिलवडी आणि अंकलखोपमध्ये साधला पूरग्रस्तांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी भिलवडी आणि अंकलखोपमध्ये साधला पूरग्रस्तांशी संवाद

राज्यात गेल्या काही दिवसात अनेक भागात पूर, भूस्खलन आणि पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘ज्या क्षणी अतिवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. जिथे जिथे शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करायला सुरवात केली. जवळपास ४ लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जिवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.’

‘सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होतं, अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचं देखील नुकसान झालं आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारचं. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे. किती घरे उध्वस्त झाले, किती मदत करावी लागेल. तसेच काही ठिकाणी कायमस्वरुपी मदत करावी लागेल. त्यासाठी तुमची तयारी हवी,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी पुनर्वसन करावं लागेल. त्याची तयारी ही तुमची सगळ्यांची असली पाहीजे. पाण्याच्या पातळ्या मोजण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. सरकारकडून तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. येवढं वचन मी तुम्हाला देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिलवडीतील नागरिकांना सांगितले.’

भिलवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी अंकलखोपमधील ग्रानस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतिवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे. मी सर्वांची निवेदने घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर चर्चा करू.पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का? अतिवृष्टीचा इशारा येताच प्रशासनाने या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version