छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर परिसरात सोमवारी पहाटे ३० वर्षीय कोमल योगेश मोरे या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून एम. वाळूज पोलिसांनी संगणक अभियंता पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सासरच्या मंडळींनी कोमल यांच्या वडिलांना फोन करून 'कोमल उठत नाहीये, ती बेशुद्ध पडली आहे' अशी माहिती दिली होती. बातमी मिळताच कोमल यांचे वडील आणि भाऊ तातडीने बजाजनगर येथील घरी पोहोचले, मात्र तेथे कोमल मृत अवस्थेत आढळून आल्या. सासरचे लोक हा अपघात किंवा आजारपणाचा बनाव करत असल्याचा आरोप करत माहेरच्या मंडळींनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांचा विवाह २०१६ मध्ये संगणक अभियंता असलेल्या योगेश मोरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चालल्यानंतर, पती योगेश हा दारूच्या नशेत कोमल यांना नियमितपणे मारहाण करत असे. याशिवाय सासू, सासरे आणि दीर यांच्याकडूनही त्यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचे माहेरच्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
माहेरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एम. वाळूज पोलीस ठाण्यात पती योगेश मोरे, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण काय आणि हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा, याचा शोध घेण्यासाठी पोलीस वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.