जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. भाविक आपल्या मनाने दानही देत असतात. अशातच आता माता वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या दागिन्यांची तपासणी करत असताना, सरकारी टांकसाळीला 95 टक्क्यांहून अधिक चांदीच्या वस्तू बनावट असल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर मंडळाने सुमारे 20 टन चांदीचे दागिने वितळवून साठवण्यासाठी सरकारी टांकसाळीत पाठवले. या दरम्याने टांकसाळीला असे आढळून आले की, या चांदीच्या वस्तूंपैकी केवळ 5-6 टक्के वस्तूच खऱ्या चांदीच्या होत्या, तर उर्वरित भाग कॅडमियम आणि लोखंडाचा होता.
टांकसाळीतील या शोधामुळे चिंता वाढली आहे, कारण मंदिर मंडळाला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे 500-550 कोटी रुपयांची चांदी सापडेल अशी अपेक्षा होती. प्राथमिक तपासानुसार चांदीचे मूल्य केवळ 30 कोटी रुपये असू शकते. चांदीचा सध्याचा भाव अंदाजे 2,75,000 रुपये प्रति किलोग्राम आहे, तर दिसायला चांदीसारख्याच असलेल्या कॅडमियम या धातूचा भाव फक्त 400-500 रुपये प्रति किलोग्राम आहे.
कॅडमियमचा आगरोग्याला धोका
आर्थिक फसवणुकीव्यतिरिक्त, कॅडमियममुळे आरोग्याला गंभीर धोकाही निर्माण होतो. त्याच्या कर्करोगजन्य धुरामुळे BIS ने ग्राहक उत्पादनांमध्ये त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. हे प्रदूषण स्थानिक पातळीपुरतेच मर्यादित असल्याचे दिसते. कारण तिरुपती किंवा सिद्धिविनायक यांसारख्या इतर प्रमुख धार्मिक स्थळांवर अशा प्रकारच्या भेसळीची कोणतीही नोंद झालेली नाही. वैष्णो देवी मार्गावर आणि त्याच्या आसपास यात्रेकरूंना चांदीच्या वस्तू विकणारे सोनार आणि विक्रेते हे यामागील संभाव्य गुन्हेगार असल्याचे मानले जाते. या दूषित अर्पणांवर प्रक्रिया करताना टांकसाळीला इतर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. मंदिर मंडळाने दान केलेल्या सुमारे 70 किलो चांदीमध्ये केवळ 3 किलो खरी चांदी होती, असे टांकसाळीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड
सामग्री वेगळी करण्यासाठी सुमारे तीन महिने लागले, आणि त्यातील फक्त काही लहान भागांमध्येच चांदीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. चांदीची ओळख पटवण्यासाठीसुद्धा एका हाताने चालवल्या जाणाऱ्या उपकरणाचा वापर करावा लागला, ज्याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.