मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबईत एका दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुलुंडमधील नाणेपाडा इथं एका ग्राउंड प्लस टू असं स्ट्रक्चर असणाऱ्या इमारतीत दोन कुटुंब वास्तव्य करत होती. इमारतीला पालिका प्रशासनाने धोकादायक घोषित केलं होतं. त्यानतंरही संबंधित इमारतीमध्ये कुटुंब राहत होते. आता दुर्घटनेनंतर सर्वांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईत मुलुंड पूर्वेला असलेल्या नाणेपाडा परिसरात मोती छाया इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. पालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केल्यानंतरही तिथे वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता स्लॅब कोसळून घडलेल्या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्याला प्राण गमवावे लागले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे देवशंकर शुक्ला (वय ९३) आणि आरती शुक्ला (वय ८७) अशी आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बचावकार्य वेगाने करण्यात आलं. दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे आता मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही या इमारतीमध्ये काही जण राहत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version