Tirupati Prasad: देशातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. लाखो भक्त दररोज ज्या लाडू प्रसादाचा आदराने स्वीकार करतात, त्या पवित्र प्रसादात भेसळीचं काळं कारस्थान उघड झालं आहे. 250 कोटी रुपयांचा बनावट तुपाचा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे.
केमिकलमधून बनलेलं ‘तूप’
सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील ‘भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी’ या संस्थेने 2019 ते 2024 या काळात तिरुपती मंदिराला तूप पुरवले. परंतु तपासात लक्षात आले की या डेअरीनं कधीच दूध किंवा लोणी खरेदी केलं नव्हतं. त्याऐवजी मोनोडायग्लिसराइड्स आणि अॅसिटिक अॅसिड एस्टर यांसारख्या केमिकल्सचा वापर करून कृत्रिम तूप तयार केलं जात होतं.
हेच बनावट तूप मंदिर प्रशासनाला पाठवून, ‘शुद्ध देशी तूप’ म्हणून लाखो भक्तांना वितरित करण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी अजय कुमार सुंगध याने हे केमिकल्स डेअरीला पुरवले आणि संपूर्ण कारवाई लपवण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार करण्यात आली.
खोटे रेकॉर्ड आणि फसवणुकीची जाळं
सीबीआयच्या अहवालानुसार, उत्तराखंडच्या भगवानपूरमधील या डेअरीचे संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट उत्पादनासाठी एक विशेष युनिट उभारलं होतं. त्यांनी दूध खरेदीचे बनावट बिल तयार केले, जेणेकरून सरकारी तपासणीमध्ये सगळं व्यवस्थित असल्याचं भासवता येईल.
2022 मध्ये जेव्हा या डेअरीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं, तेव्हा त्यांनी नव्या नावांनी वेगवेगळ्या कंपन्या सुरू करून तोच बनावट माल पुरवण्याचा खेळ सुरू ठेवला. ‘वैष्णवी डेअरी (तिरुपती)’, ‘माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश)’ आणि ‘एआर डेअरी फूड्स (तमिळनाडू)’ या नावांनी सप्लाय केल्याचं समोर आलं आहे.
भक्तांमध्ये संताप आणि प्रश्नचिन्हं
तिरुपती लाडू हा देशातील सर्वात प्रसिद्ध प्रसाद मानला जातो. प्रत्येक भक्तासाठी तो श्रद्धेचा प्रतीक आहे. मात्र आता या घोटाळ्यामुळे भक्तांच्या भावनांना धक्का बसला आहे. मंदिर प्रशासनाने या प्रकरणावर मौन बाळगल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एवढं मोठं रॉ मटेरियल मंदिरात कसं पोहोचलं? गुणवत्ता तपासणी कुठं अपयशी ठरली?
तपास यंत्रणा आणि देवस्थान प्रशासन यांच्यातील समन्वयावरही आता संशय उपस्थित केला जात आहे.सीबीआयने संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचार आणि धार्मिक विश्वासभंगाच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढील चौकशीत मंदिरातील खरेदी प्रक्रिया, करार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी तपासली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.