Crime News : न्यायासाठी 2 वर्षे संघर्ष, पण अत्याचार करणाऱ्याला अटक नाही; संतापलेल्या 20 वर्षीय पीडितेने पोलीस ठाण्यातच पेटवून घेतले

आरोपी उजळ माथ्याने फिरत होता, तर दुसरीकडे आरोपीचे कुटुंबीय पीडित मुलीचा सतत मानसिक छळ करत होते. आईच्या आरोपानुसार, या सततच्या दबावामुळेच ती प्रचंड हताश झाली होती.
Crime News : न्यायासाठी 2 वर्षे संघर्ष, पण अत्याचार करणाऱ्याला अटक नाही; संतापलेल्या 20 वर्षीय पीडितेने पोलीस ठाण्यातच पेटवून घेतले

Rape Victim Sets Herself on Fire : पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे एका 20 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. आरोपी सौरभ सिंग याने पीडितेवर अत्याचार करून नंतर लग्नास नकार दिला होता. याप्रकरणी न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवणाऱ्या पीडितेने 21 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास बिजनौरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. या आत्मदहनामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत विझली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत असून कोतवाली प्रभारी अमर सिंह राठोड यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

न्यायासाठी 2 वर्षे संघर्ष, पण आरोपीला मिळाले संरक्षण
हे संपूर्ण प्रकरण 2024 पासून सुरू आहे. त्या वेळेस पीडितेने आरोपी सौरभ आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध बलात्काराची पहिली तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 2025 मध्ये तिने दुसरी तक्रार नोंदवली, ज्यात सौरभने शारीरिक संबंध ठेवून लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणात 2 वर्षांच्या तपासानंतर आरोपपत्र (चार्जशीट) तर दाखल केले, परंतु मुख्य आरोपीने उच्च न्यायालयातून आपल्या अटकेला स्थगिती मिळवली होती. यामुळे आरोपी उजळ माथ्याने फिरत होता, तर दुसरीकडे आरोपीचे कुटुंबीय पीडित मुलीचा सतत मानसिक छळ करत होते. आईच्या आरोपानुसार, या सततच्या दबावामुळेच ती प्रचंड हताश झाली होती.

हेही वाचा – Sangli Crime: 'तू माझ्या धर्माचा नाहीस, आधी धर्मांतर कर…' लग्नासाठी 19 वर्षीय दुर्वांकवर दबाव; उचललं टोकाचं पाऊल

पोलीस ठाण्यात नेमके काय घडले?
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली असून घटनेच्या दिवशी, म्हणजेच 21 जून रोजी ही तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आरोपीला तात्काळ तिथे हजर करण्याची मागणी लावून धरली. पोलिसांनी तिला समजावत दुसऱ्या दिवशी आरोपीच्या बाजूच्या लोकांना बोलावण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याचवेळी पीडितेच्या सावत्र वडिलांनी तिला एका बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणून दिला. हतबल झालेल्या तरुणीने स्वतःवर ते द्रव ओतून घेत पोलीस ठाण्यातच आग लावून घेतली. तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवून तिला स्थानिक रुग्णालयात नेले, जिथून तिला पुढे दिल्लीला हलवण्यात आले होते.

आरोपी काश्मीरमध्ये तैनात; पोलिसांचे पथक रवाना
अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्ण गोपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ सिंग आणि त्याचा भाऊ गौरव हे दोघेही भारतीय सैन्यात असून सध्या काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी बिजनौर पोलिसांचे एक विशेष पथक काश्मीरसाठी रवाना झाले आहे. एका पीडितेने थेट पोलीस ठाण्यातच असे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा बलात्कार, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime: प्रेयसीने नातं तोडलं अन् प्रियकराने गाठली विकृतीची परिसीमा! तरुणीचा खाजगी व्हिडिओ थेट भावालाच पाठवला अन्…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version