उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे संशयास्पद परिस्थितीत गोळी लागून 22 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थी साहिल हा खासगी शाळेत राहून शिक्षण घेत होता. संबंधित शाळा त्याचे फुफा लक्ष्मीकांत तिवारी उर्फ अनिल तिवारी यांच्या गावात असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना घूरपूर पोलीस ठाणे हद्दीतील चक गौरीशंकर नीबी गावातील असल्याचे सांगितले जात आहे. साहिल हा लालपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील गोबरा तरहार गावचा रहिवासी होता. शुक्रवारी सकाळी शाळेतील एका खोलीत त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. साहिलचे वडील रेवती रमण शुक्ला हे शेतकरी असल्याची माहिती आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता साहिल खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या एका हातात 315 साईजचे पिस्तूल होते. त्याचे दोन्ही पाय समोरील खुर्चीवर ठेवलेले होते आणि जवळ एक जिवंत काडतूसही सापडले. साहिलच्या कपाळावर अतिशय जवळून गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले असून डोक्याचा काही भाग जमिनीवर पडलेला होता. त्याच्या कानात इयरबड लावलेले असल्याने गोळी झाडण्यापूर्वी तो कोणाशी तरी बोलत होता का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच एसीपी कौंधियारा अब्दुल सलाम खान फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण खोलीची तपासणी करून सर्व पुरावे जप्त करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
साहिलच्या मोबाईलची कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात येत असून गोळी लागण्यापूर्वी त्याचा कोणाशी संवाद झाला होता का, याचा शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे
हेही वाचा: Ladki Bahin Yojana : ई-केवायसी भरूनही खात्यात पैसे जमा नाहीत, बहिणींचा संताप
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.