अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन एबसॉल्यूट रिजॉल्व’ (Operation Absolute Resolve) संदर्भात खळबळजनक खुलासे केले आहेत. या कारवाईपूर्वी संपूर्ण व्हेनेझुएलाची वीजपुरवठा व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली होती, त्यामुळे देशभर ब्लॅकआउट (Complete Electricity Shutdown) झाला होता, असा दावा ट्रम्प यांनी केला.
या ऑपरेशनदरम्यान सामान्य नागरिक हे अमेरिकन लष्कराचे लक्ष्य नव्हते, हे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. ब्लॅकआउटमुळे लोकांच्या घरांमध्ये केवळ मेणबत्त्यांचा प्रकाश होता, रस्त्यांवर शांतता होती. वर आकाशात फायटर जेट्स घिरट्या घालत होते आणि स्फोटांचे आवाज होत होते, मात्र भीतीमुळे नागरिक घराबाहेर न आल्याने कोणतीही नागरिकांची जीवितहानी झाली नाही, असा दावा त्यांनी केला.
अमेरिकन सैन्याला स्पष्ट आदेश देण्यात आले होते की कोणत्याही परिस्थितीत रहिवासी भागांवर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ला करू नये. एकीकडे आकाशात हवाई कारवाई सुरू होती, तर दुसरीकडे जमिनीवर United States Army चे जवान मार्ग मोकळा करत मादुरो यांच्या घराकडे पुढे सरकत होते, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
या संपूर्ण मोहिमेत अमेरिकन सैन्याचे कोणतेही नुकसान झाले नाही, मात्र व्हेनेझुएलाच्या सुरक्षा रक्षक दल आणि सैन्याचे काही जवान मारले गेल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. “लोकांचे प्राण वाचवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी शटडाउन हा सर्वात योग्य आणि प्रभावी पर्याय होता. हे ऑपरेशन अतिशय अचूक, धाडसी आणि अविश्वसनीय होता,” असे वर्णन त्यांनी केले.
ट्रम्प यांनी या कारवाईमागील खरा हेतूही स्पष्ट केला. अमेरिकेला व्हेनेझुएलावर कब्जा करण्याचा कोणताही इरादा नसून, हे संपूर्ण ऑपरेशन केवळ तेलासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “व्हेनेझुएलाचे तेल अमेरिकेच्याच ताब्यात राहील. उत्पादन आणि व्यापारासाठी अमेरिकन तेल कंपन्या गुंतवणूक करतील आणि महसूल मिळवतील,” असे ट्रम्प म्हणाले.
याशिवाय, 2016 मध्येच आपण व्हेनेझुएलावर कारवाई होईल, असे सांगितले होते आणि आपल्या कार्यकाळात ती झाली तर तेल अमेरिकेकडेच राहील, हा शब्द पूर्ण झाला असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या व्हेनेझुएलाचे नवे सरकार ही अट मान्य करण्यास तयार नसले, तरी शेवटी त्यांना अमेरिकेच्या अटी स्वीकाराव्याच लागतील, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.