मुंबईतील कांदिवली (पश्चिम) परिसरात एलपीजी सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारकोप भागात उभी असलेल्या डिलिव्हरी टेम्पोमधून तब्बल 27 सिलेंडर चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
डिलिव्हरी कर्मचारी नंदकुमार रामराज सोनी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 25 मार्च 2026 रोजी त्यांनी काका केनी चौकाजवळ एलपीजी सिलेंडरने भरलेला टेम्पो उभा केला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी परत आल्यावर टेम्पोची काच फुटलेली आणि मागील कुलूप तोडलेले आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमध्ये एकूण 27 गॅस सिलेंडर होते, त्यापैकी पाच भरलेले तर 22 रिकामे सिलेंडर चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून काही संशयित व्यक्ती आणि वाहने दिसून आली आहेत. त्यांच्या ओळखीचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे गॅस पुरवठ्याबाबत आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, या घटनेमुळे नागरिकांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.