Mary Kom Apology Video : "खूप वर्षांपासून माझ्या मनात दुःख…" अखेर मेरी कॉमने तिच्या वादग्रस्त विधानाबाबत मागितली माफी

विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील परिस्थिती स्पष्ट केली असून, या व्हिडीओनंतरही त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
Mary Kom Apology Video :  "खूप वर्षांपासून माझ्या मनात दुःख…" अखेर मेरी कॉमने तिच्या वादग्रस्त विधानाबाबत मागितली  माफी

नवी दिल्ली : भारताची दिग्गज बॉक्सर आणि नेत्या मेरी कॉम सध्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका चॅट शोमध्ये त्यांनी माजी पती करुंग ऑन्लर यांच्याशी 2023 मध्ये झालेल्या घटस्फोटामागची कारणे उघड केली होती. मेरी कॉम यांनी आरोप केला होता की, त्यांच्या बॉक्सिंग कारकिर्दीतून कमावलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली, त्यांच्या नावावर कर्ज घेतले गेले आणि त्यांची मालमत्ता परवानगीशिवाय दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली.

या आरोपांनंतर करुंग ऑन्लर यांनीही प्रत्युत्तर देत, विवाह काळात मेरी कॉम यांनीच आपली फसवणूक केल्याचा दावा केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण अधिक चिघळले आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मेरी कॉम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली असून, त्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

व्हिडीओमध्ये मेरी कॉम म्हणतात, “नमस्कार. सर्वात आधी मी माफी मागू इच्छिते. सोशल मीडियावर माझ्या विधानांमुळे अनेक लोक गोंधळात पडले. मी हे स्पष्ट करू इच्छिते की माझे लग्न कधीच यशस्वी नव्हते, असे मी म्हणत नव्हते. अनेक वर्षे सर्व काही ठीक होते. मात्र जेव्हा विश्वास पूर्णपणे तुटला, तेव्हाच परिस्थिती बदलली.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांच्याबद्दल कितीही काही बोलले गेले तरी त्यांनी नेहमी सन्मान आणि संयम राखला.

हेही वाचा: WPL 2026 Final Match: आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ‘फायनल महामुकाबला’; अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य ‘Playing 11’

चॅट शोमध्ये केलेल्या एका विधानावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “गली-गलीमध्ये फुटबॉल खेळतात” या त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे सांगत त्या म्हणाल्या की, त्या युवक फुटबॉल संस्कृती किंवा फुटबॉल क्षेत्राविरोधात नाही. “मला फुटबॉल हा खेळ आवडतो, मी स्वतःही खेळते,” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या आधीच्या पतीने फुटबॉल कारकिर्दीचा त्याग केल्याचा दावा केला असला, तरी दिल्लीमध्ये भेट होण्यापूर्वी ते शिलाँगमध्ये फुटबॉल खेळत होते.

मेरी कॉम यांनी वक्तव्यांमुळे दुखावलेल्या पुरुष समुदायाचीही माफी मागितली. “तो क्षण माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण होता. अनेक वर्षांचे दडपलेले दुःख, नैराश्य, वापरल्याची भावना आणि विश्वासघात एकाच वेळी बाहेर आला,” असे त्या म्हणाल्या.

मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. काही युजर्सनी हा व्हिडीओ स्क्रिप्ट वाचून रेकॉर्ड केल्याचा आरोप केला, तर काहींनी त्यांच्या भावना बनाव असल्याची टीका केली. एकीकडे खुलासा आणि माफी, तर दुसरीकडे टीका या सगळ्यातून मेरी कॉम यांचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेचा विषय बनले आहे.

हेही वाचा: Udhampur Encounter: उधमपूरच्या जंगलात जैशच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने स्फोटाने उडवली गुहा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version