विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. आता या मालिकेतील निर्णायक सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या स्टार फलंदाज विराट कोहलीने तुफानी कामगिरी करत सलग दोन शतके झळकावली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही कोहलीकडून मोठ्या खेळीची सर्वांना मोठी अपेक्षा आहे. या निर्णायक सामन्यात कोहलीला केवळ मोठी इनिंग खेळण्याचीच नाही, तर आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याला गाठण्याची संधीही मिळणार आहे.
आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी गाठलेला हा विक्रम कोहली आता पूर्ण करू शकेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक धावेकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. कोहली टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत ते टीम इंडियासाठी खेळत राहील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते.
विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या या सामन्यात कोहलीने केवळ 90 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28000 धावांचा भव्य टप्पा पार करणारे तो जगातील तिसरा महान खेळाडू ठरेल. सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनीच आतापर्यंत हा विक्रम गाठला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर 34357 धावांसह अव्वल आहे. संगकाराने 28016 धावा केल्या असून कोहलीच्या नावावर 27910 धावा आहेत. त्यामुळे पुढील सामन्यातील 90 धावा कोहलीला या ऐतिहासिक यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवून देऊ शकतात.
विशाखापट्टणमचा मैदान कोहलीसाठी नेहमीच 'लकी' ठरले आहे. या मैदानावर त्यांनी आतापर्यंत सात वनडे सामने खेळले असून तब्बल 97.83 च्या सरासरीने 587 धावा जमवल्या आहेत. या कालावधीत त्यांच्या बॅटमधून तीन शतके आणि दोन अर्धशतकेही झाली आहेत. त्यामुळे या निर्णायक सामन्यातही कोहली मोठी खेळी खेळेल, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचा निकाल ठरवणारा तिसरा सामना अतिशय रोमांचक ठरेल, अशी चिन्हे आहेत. कोहलीच्या शानदार फॉर्ममुळे टीम इंडियाचे मनोबल उंचावलेले आहे आणि त्याच्या ऐतिहासिक विक्रमाच्या आशेने हा सामना अधिकच उत्सुकतेचा ठरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.