देशात आयपीएलदरम्याव क्रिकेटप्रती लोकांचे प्रेम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. रविवारी पार पडलेल्या आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यादरम्यान सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळाला. जो तो शक्य होईल तिथे हा सामना पाहत होता. या सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोचिंग सेंटरमध्येच थांबलेल्या एका कोचिंग क्लास संचालकाची त्याच्याच कोचिंग सेंटरमध्येच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपुरच्या नवाबगंजमध्ये प्रकाश गुप्ता हे त्यांचा 'डेटा एक्स्पर्ट कॉम्प्युटर सेंटर' नावाचा एक कोचिंग क्लास चालवायचे. रविवारी 31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोचिंग सेंटरमध्येच थांबले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून हे कळवले की, त्यांना घरी यायला उशीर होऊ शकतो, त्यामुळे ते घरी न येता कोचिंग सेंटरमध्येच झोपणार आहेत. यापूर्वी देखील ते अनेकदा कोचिंग सेंटरमध्येच कामानिमित्त थांबले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय कसले ही प्रश्न न करता निश्चिंत होते.
मात्र त्या रात्री त्यांना कोणी तरी निर्घृणपणे संपवले. घरातल्यांनी सकाळ झाली तरी ते घरी का नाही आले त्यामुळे ते घरी कधी येणार हे विचारण्यासाठी प्रकाश यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कुटुंबियांच्या एका ही फोनला प्रतिसाद दिला नाही. चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबियांना शंका आणि नको नको ते विचार येऊ लागले. त्यामुळे प्रकाश यांचे बंधू विकास गुप्ता कॉम्प्युटर कोचिंग क्लासमध्ये पोहचले. त्यावेळेस तिथे जे पाहिलं ते पाहून विकास यांच्या पायाखालील जमीन सरकली. प्रकाश यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. यावेळी त्यांच्या शरीरावर असंख्य खोलवर जखमा आढळून आल्या, ज्यामुळे अतिरक्तस्त्रवामुळे त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी प्रकाश यांच्याकडून लाखो रुपये, सोन्याची चेन आणि ब्रेसलेट गायब होतं. त्यामुळे त्यांची हत्या लुटमारीमुळे केली असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच नवाबगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी त्यांचं शव ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीला पाठवलं आहे. तसेच फॉरेन्सिक आणि घटनास्थळावरील पुरावे गोळा करून घटनेचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान प्रकाश हे अविवाहित होते. त्यांना क्रिकेटमध्ये विशेष रस होता. त्यामुळे ते क्रिकेट सामने वेळात वेळ काढून पाहायचे. मात्र हीच गोष्ट त्यांच्या जीवावर बेतली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.