हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली असून बांधकाम सुरू असलेल्या भिंतीचा अचानक कोसळून सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी संध्याकाळी गुरुग्राममधील सिधरावली परिसरात असलेल्या ‘सिग्नेचर ग्लोबल’ या बांधकामाधीन निवासी प्रकल्पात घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एक मोठी काँक्रीटची रिटेन्शन भिंत अचानक कोसळली. भिंत पडताच बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात माती घसरली आणि तेथे काम करत असलेले 12 ते 15 मजूर मलब्याखाली दबले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
बचाव पथकाने जखमी मजुरांना तात्काळ जवळील भिवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यापैकी सात मजुरांना मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षाविषयक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
पोलीस तपासानुसार, त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी खोदकाम सुरू होते. या कामादरम्यान रिटेन्शन वॉल अचानक कोसळली आणि बेसमेंटमध्ये काम करणारे मजूर तिच्या खाली दबले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही कामगारांच्या मते, मलब्याखाली अजूनही काही मजूर अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांपैकी सहा जणांची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये सतीश, भागीरथ, मिलन, शिवशंकर, मंगल आणि परमेश्वर यांचा समावेश आहे. तर छोटेलाल, दीनदयाल, शिवकांत आणि इंद्रजीत हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर रात्रीच्या अंधारातही बचावकार्य सुरू ठेवण्यासाठी घटनास्थळी हाय मस्त लाईट्स आणि जेसीबीसारखी यंत्रे तातडीने मागवण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात जर निष्काळजीपणा आढळला तर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. मृत किंवा जखमी मजुरांच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.