मुंबई: तंत्रज्ञानाचा वरदान म्हणून वापर करण्याऐवजी त्याचा विनाशकारी मार्ग निवडणाऱ्या एका तरुणाला मुंबईत महागात पडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट रेल्वे पास तयार करणाऱ्या 22 वर्षीय आदिल अन्सार खान याला रेल्वे पोलिसांनी कायदेशीर पकडलं आहे.
रेल्वेच्या तिकीट तपासणी यंत्रणेला चकवा देण्याचा हा प्रयत्न फसला आहे. ही खळबळजनक घटना 25 डिसेंबर रोजी भायखळा रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर कर्तव्यावर असलेले तिकीट तपासनीस कुणाल सावरडेकर यांनी संशयावरून आदिलला तिकीट दाखवण्यास सांगितले.
आदिलने आत्मविश्वासाने आपल्या आयफोनवर रेल्वे पासचे छायाचित्र दाखवले. मात्र, नियमानुसार पास अधिकृत 'UTS' मोबाईल ॲपमध्ये असणे बंधनकारक असते. आदिलने दाखवलेला पास केवळ फोटो स्वरूपात असल्याने सावरडेकर यांचा संशय बळावला आणि त्यांनी त्याला रेल्वे कार्यालयात नेले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केली असता, त्या पासवरील माहिती आणि अधिकृत रेल्वे प्रणाली यांचा कोणताही ताळमेळ बसला नाही.
सखोल चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. त्याने चॅटजीपीटीच्या मदतीने हुबेहूब दिसणारा बनावट पास तयार केला होता, ज्यावर मुंब्रा ते सीएसएमटी प्रवासाची एक महिन्याची वैधता आणि बनावट सीलचा वापर करून तो खरा भासवण्याचा प्रयत्न केला होता. रेल्वेची सुरक्षित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा 'एआय' पास घोटाळा उघड झाला.
सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपीवर विविध कलमे दाखल करत सह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील गंभीर तरतुदींचा समावेश आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वेची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
प्रवाशांनी अधिकृत माध्यमातूनच तिकीट आणि पास खरेदी करावे, अन्यथा त्यांना अशाच प्रकारे पोलीस कोठडीची हवा खावी लागेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.