बांगलादेश: बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, पिरोजपूर जिल्ह्यातील एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. डुमरीतला गावात एका हिंदू कुटुंबाची घरे जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लक्षपूर्वक करण्यात आलेला अल्पसंख्याकांवरील हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक माहितीनुसार, या कुटुंबाच्या किमान पाच घरांना आग लावण्यात आली. विशेष म्हणजे, पहाटेच्या सुमारास घरातील सदस्य झोपेत असताना घरांची दारे बाहेरून बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला, मात्र दारे उघडता आली नाहीत. अखेर टिनाच्या पत्र्यांना आणि बांबूच्या कुंपणाला कापून त्यांनी जीव वाचवला. या घटनेत दोन्ही कुटुंबांतील आठही सदस्य सुखरूप बाहेर पडले, मात्र त्यांची सर्व मालमत्ता आगीत भस्मसात झाली. घरात असलेली पाळीव जनावरेही आगीत होरपळून मरण पावली.
आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी काही अहवालांनुसार घरातील एका खोलीत कापड कोंबून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पिरोजपूरचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
हेही वाचा: khaleda zia Passed Away : बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन
दरम्यान, ही घटना स्वतंत्र नसून बांगलादेशात गेल्या काही महिन्यांत अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. ‘ह्युमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ या संस्थेच्या अहवालानुसार, जून ते डिसेंबर या कालावधीत ईश निंदेच्या आरोपांवरून किमान ७१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटना देशातील ३० हून अधिक जिल्ह्यांत पसरलेल्या असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः ईश निंदेच्या आरोपांनंतर जमावाकडून हिंसाचार, घरफोडी, जाळपोळ आणि थेट हत्या केल्या जात असल्याच्या घटनांमुळे अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याची घटना घडली होती. यानंतर देशभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राजकीय अस्थिरता, वाढता धार्मिक कट्टरवाद आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, आगीच्या ज्वाळांमध्ये घरे जळताना दिसत आहेत.
मानवी हक्क संघटनांनी बांगलादेश सरकारकडे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तातडीची पावले उचलण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ बांगलादेशपुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरही गंभीर ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.