कानपुर पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून लोकांना लाखो कोट्यवधी रुपयांना फसवणारी कुख्यात “लुटेरी दुल्हन” दिव्यांशी चौधरी याला अटक केली आहे. चौकशीत उघड झाले की तिने दोन बँक मॅनेजर, दोन सब-इन्स्पेक्टर यांच्यासह किमान 12 जणांना जाळ्यात ओढले आणि त्यांच्या नावाचा वापर करून मोठी आर्थिक फसवणूक केली. पोलिस तपासात तिच्या विविध खात्यांमध्ये 8 कोटी रुपयेपेक्षा जास्त व्यवहार आढळले.
पोलिसांनी सांगितले की दिव्यांशीचा संपूर्ण पद्धतशीर डाव अत्यंत शातिर होता. ती प्रथम प्रेमसंबंध किंवा लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन करायची. नंतर पीडितांसोबत नातेसंबंध निर्माण करून, रेप किंवा छेडछाडीचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी देत मोठी रक्कम उकळत असे. पैसे मिळाल्यानंतर ती कोर्टात जाऊन स्वतःच जबाब बदलत प्रकरण मागे घेत असे आणि समजूत झाली असे दाखवत सुटायची.
17 फेब्रुवारी रोजी बुलंदशहरच्या सब-इन्स्पेक्टर आदित्य कुमार लोचव यांच्याशी तिचे चौथे लग्न झाले. स्कॉर्पियो गाडी, महागडे दागिने आणि भव्य लग्नाचे आमिष दाखवत आदित्य आणि त्यांच्या कुटुंबाला फसवण्यात आले. लग्नानंतर काही महिन्यांतच आदित्य यांना तिच्या वागण्यात संशय वाटू लागला. ती सासरी कमी राहायची, फोनमधून सर्व UPI Applications उघडायची आणि ड्यूटीवर असताना सतत पैशांची मागणी करायची. एक दिवस आदित्य यांनी अचानक पत्नीचा फोन तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. दहा पेक्षा अधिक बँक खात्यांमधून प्रचंड रक्कमेचा व्यवहार दिसत होता. विचारणा करताच दिव्यांशी भांडण करून माहेरी निघून गेली.
25 नोव्हेंबर 2025 रोजी तिने कानपुर पोलिस कमिश्नर ऑफिसमध्ये नाटक करत आदित्य यांच्यावर 14.50 लाख रुपये हडपल्याचा आणि इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला. मात्र आदित्य यांनी दिलेले पुरावे पाहताच पोलिसांच्या हातात संपूर्ण प्रकरणाचा धागा लागला. तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. दिव्यांशीच्या खात्यांमधून मेरठ झोनात तैनात काही पोलिस अधिकारी, सब-इन्स्पेक्टर व इंस्पेक्टर यांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ट्रान्झॅक्शन दिसले.
पोलिसांच्या मते या रॅकेटमध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो. या सततच्या दबावामुळे आदित्य यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. सोमवार उशिरा रात्री पोलिसांनी दिव्यांशी चौधरीला अटक केली. तिच्यावर फसवणूक, खंडणी, ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी कटयंत्रणा यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांत कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही तासांत कानपुर पोलिस याबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करू शकतात. संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत याची चौकशी सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.