महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे. पुण्यात “व्यंग, वास्तव आणि राजकारण” या विषयावर 18 व्या जागतिक मराठी संमेलनात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या राजकारणांवर राज ठाकरे यांनी बोट ठेवले आहे. महाराष्ट्राचं राजकारण दिशाहिन झाल्याचं चित्र आहे. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलिकडे काही दिसत नाही. असे राज म्हणाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व त्यांच्यानंतर भाजपा आणि शिंदे गट आणि इतरही काही पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे मोठे वाद निर्माण झाले होते. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की,’मी अनेक भाषणांमधून सांगितलं आहे की जातीजातीत तेढ निर्माण करणं, महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणं. हे काय राजकारण नव्हे. आजकाल कोणीही इतिहासतज्ज्ञ होत आहे. कारण हे दाखवतायेत ना? दाखवायचं बंद केलं तर हे सगळं बंद होईल. मूळ प्रश्न बाजूला ठेऊन हे कायतरी ह्यांचं 24 तास सुरूच आहे. म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो. पवार साहेब जे म्हणतात ना, मी कधीतरी उगवतो ते बरोबरच आहे’, असे राज ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.