नवी दिल्ली: भारताची वेगाने वाढणारी प्रगती अनेक मुस्लिम देशांना अस्वस्थ करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान त्यांच्यात एकजूट निर्माण करून भारताविरुद्ध मोठी रणनीती आखण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानने विविध मुस्लिम राष्ट्रांच्या नेत्यांशी संवाद वाढवून भारताच्या सामरिक आणि राजनैतिक प्रभावाला आव्हान देण्याची योजना आखली आहे. याचा पुरावा 9 सप्टेंबर रोजी कतारमध्ये इस्रायलविरुद्ध बोलावलेल्या आपत्कालीन शिखर परिषदेत दिसून आला, जिथे तब्बल 60 मुस्लिम देशांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. या परिषदेत पाकिस्तान आणि इजिप्तने “इस्लामिक नाटो” व “युनायटेड इस्लामिक मिलिटरी फोर्स” निर्माण करण्याचा विचार मांडला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या कल्पनेला पूर्ण पाठिंबा दिला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने या देशांच्या अधिक जवळ जावून स्वतःचं नाक घासण्याचा प्रयत्न वाढवला असून भारताविरोधात मुस्लिम देश एकत्र येतील, असा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून येतो.
या संपूर्ण घडामोडीमध्ये तुर्कीची भूमिका विशेष लक्षवेधी ठरते. तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर यांनी जुलै महिन्यात पाकिस्तानला भेट देत प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली, तसेच भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान दाखवलेल्या लष्करी ताकदीनंतर पाकिस्तानच्या पाठीशी तुर्की उभा राहिला. दोन्ही देशांमध्ये त्यानंतर तब्बल 900 दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाला, ज्याअंतर्गत तुर्की पाकिस्तानला TB2 तंत्रज्ञान आणि अकिंसी ड्रोन पुरवणार आहे.
तुर्कीव्यतिरिक्त अझरबैजान आणि जॉर्डन हेही पाकिस्तानचे विश्वासू भागीदार मानले जातात. तुर्की नाटोचा भाग आहे, जॉर्डन अमेरिकेवर अवलंबून आहे आणि अझरबैजान तुर्कीच्या प्रभावाखाली आहे. ही संपूर्ण साखळी पाकिस्तानला सामरिक पाठबळ देत असून भारताच्या सुरक्षेसाठी नवे आव्हान निर्माण करत आहे. भविष्यात भारत – पाकिस्तान संघर्ष वाढला तर हे तीनही देश पाकिस्तानला शस्त्रसहाय्य देऊ शकतात, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. संरक्षण विश्लेषक मेजर जनरल जी. डी. बक्षी यांच्या मते, पाकिस्तान भारताला अडचणीत आणण्यासाठी सर्व शक्य मार्गांचा अवलंब करत आहे आणि इतर मुस्लिम देशांनाही भारताविरुद्ध भडकवत आहे.
भारताने या परिस्थितीत बचावात्मक भूमिका घेऊ नये, तर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडून प्रत्युत्तर द्यावे, असे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या प्रभावी कारवाईनंतर पाकिस्तानची भीती वाढली असून त्यामुळे तो मुस्लिम देशांकडे धाव घेत आहे. पाकिस्तानचे हे प्रयत्न भारताविरोधात एक व्यापक आघाडी उभी करण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत, आणि त्यामुळे भारतासाठी आगामी काळ सामरिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.