Nepal Flood : नेपाळचा मोठा निर्णय! भारत आणि अमेरिकेची मदत पथकं नाकारली; म्हणाला, ‘आम्ही आपत्ती हाताळण्यास…’

भारत, अमेरिका, ब्रिटन आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांनी मदतीचा हात पुढे करत आपापली विशेष मदत दले पाठवण्याची तयारी दर्शवली होती, परंतु नेपाळने ही पथके स्वीकारण्यास नम्रतापूर्वक नकार दिला आहे.
Nepal Flood : नेपाळचा मोठा निर्णय! भारत आणि अमेरिकेची मदत पथकं नाकारली; म्हणाला, ‘आम्ही आपत्ती हाताळण्यास…’

Nepal Flood : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये निसर्गाच्या भीषण कोपामुळे ओढवलेल्या आपत्तीच्या काळात काठमांडू प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांनी मदतीचा हात पुढे करत आपापली विशेष मदत दले पाठवण्याची तयारी दर्शवली होती, परंतु नेपाळने ही पथके स्वीकारण्यास नम्रतापूर्वक नकार दिला आहे. नेपाळचे राष्ट्रीय सैन्य आणि स्थानिक पोलीस यंत्रणा या महाकाय आपत्तीचा सामना करण्यास पूर्णपणे समर्थ असल्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केल्यानंतरच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

भाषेची अडचण आणि समन्वयाचा अभाव टाळण्यासाठी निर्णय
परकीय पथकांना रोखण्यामागे नेपाळचा 2015 मधील विनाशकारी भूकंपाचा जुना अनुभव कारणीभूत ठरला आहे. त्या वेळी जगातभरातून आलेले मदत पथक, भाषेचा अडसर आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्यामुळे बचावकार्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तोच सावळागोधळ टाळण्यासाठी यंदा सरकारने केवळ आर्थिक सहाय्य आणि मदत सामग्री स्वीकारण्याचे धोरण आखले आहे. भारताने तातडीने 'एनडीआरएफ'च्या तुकड्या पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र नेपाळने सैनिकी तुकड्यांऐवजी भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे केवळ आवश्यक अन्नाची व औषधांची पाकिटे स्वीकारली आहेत.

हजारहून अधिक परदेशी पर्यटकांची सुटका; शेकडो नागरिक अजूनही बेपत्ता
नेपाळच्या सशस्त्र दलांनी अत्यंत दुर्गम आणि तुटलेल्या भागात शर्थीचे प्रयत्न करत आतापर्यंत 1,024 परदेशी पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढले आहे. असे असूनही परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या सुमारे 90 अमेरिकन नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. सध्या 32 वेगवेगळ्या देशांतील 700 हून अधिक नागरिक बेपत्ता असून, यामध्ये नेपाळच्या हद्दीत 517 आणि लगतच्या चीनच्या सीमेत सुमारे 260 पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Girish Mahajan: 'घाबरू नका, सरकार खंबीरपणे पाठीशी…'; नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी गिरीश महाजन यांचा थेट संवाद

ऑस्ट्रेलियाकडून मदतीचा हात; आर्थिक पाठबळ जाहीर
या संकटाच्या काळात ऑस्ट्रेलिया सरकारने नेपाळच्या मदतीसाठी 50 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 35 कोटी रुपये) या तातडीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. रस्त्यांचे जाळे उद्ध्वस्त झाल्याने अडचणीत सापडलेल्या नागरिकांपर्यंत अन्न व वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल. याशिवाय नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या 39 नागरिकांचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने विशेष अधिकाऱ्यांची एक चमू काठमांडूकडे रवाना केली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version